काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अरुण धिमधिमे यांच्या स्मृतिनिमित्त या वर्षीपासून अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांना ‘पुण्यरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यंदाचा पुण्यरत्न पुरस्कार माजी महापौर शांतिलाल सुरतवाला आणि पुणे महापालिकेचे माजी नगरअभियंता पी. टी. पवार यांना जाहीर झाला आहे.
अरुण धिमधिमे हे १९९२ साली काँग्रेस पक्षाकडून प्रथम नगरसेवक म्हणून महापालिकेवर निवडून गेले. त्यानंतर त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्ष, शहर सुधारणा समिती अध्यक्ष, काँग्रेसचे सरचिटणीस अशी अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती. सार्वजनिक नळकोंडाळी बंद करून प्रत्येक घरात आणि प्रत्येक झोपडीत स्वतंत्र नळजोड देण्याची महत्त्वाकांक्षी योजना त्यांनी अत्यंत धडाडीने पूर्णत्वास नेली होती. तसेच रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचा प्रकल्पही त्यांच्या आग्रहातून सुरू झाला होता. शहराचा विकास आराखडा देखील त्यांच्याच कारकीर्दीत मार्गी लागला होता. नगरसेवक व लोकनेते अरुण धिमधिमे यांच्या उत्कृष्ट आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पुण्यरत्न’ पुरस्कार सुरू करण्यात आला असून नगरसेवक आबा बागुल, सुधीर जानजोत, वीरेंद्र किराड, चंद्रकांत कदम, शिवा मंत्री, बाळासाहेब मारणे अशा सर्व मित्रांच्या समितीतर्फे हा पुरस्कार दिला जाणार आहे.
शांतिलाल सुरतवाला हे ४५ वर्षांपासून राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत. ते दीर्घकाळ नगरसेवक होते तसेच महापौरपदही त्यांनी भूषविले आहे. ते अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असून रक्तदान मोहिमेत सध्या काम करत आहेत.
पी. टी. पवार हे पुणे महापालिकेचे निवृत्त नगर अभियंता असून त्यांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा यासह बहुतांशी सर्व खात्यांमध्ये महत्त्वाची पदे सांभाळलेली आहेत. पुण्यातील वाहतूक समस्या, भविष्यातील पाणीपुरवठा आदींबाबात विचार करून त्यांनी तयार केलेले प्रकल्प आजही मार्गदर्शक व शहराला उपयुक्त ठरत आहेत.