पुण्यभूषण फाउंडेशन आणि त्रिदल पुणे यांच्यातर्फे प्रसिद्ध उद्योजक आणि पूनावाला ग्रुपचे डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या ग्रामदैवतांच्या प्रतीकांसह सोन्याच्या फाळाने पुण्यभूमी नांगरणारे बालशिवाजी असे स्वरूप असलेले स्मृतिचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
रोगप्रतिबंधक लस उत्पादन, अश्व पैदास, इमारत बांधकाम आणि आर्थिक क्षेत्रात योगदान देत पुण्याचे नाव जगभर पोहोचविणाऱ्या डॉ. सायरस पूनावाला यांना यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने देण्याचे निश्चित केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या कार्यक्रमात पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात अप्रकाशित अशा पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांनाही गौरविण्यात येणार असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी सांगितले.
१९६३ मध्ये वाणिज्य शाखेची घेतलेल्या सायरस पूनावाला यांनी १९८८ मध्ये पुणे विद्यापीठाची पीएच. डी. संपादन केली. त्यांनी १९६६ मध्ये  सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाची स्थापना एक लघुउद्योग म्हणून केली. जगातील सर्वात मोठे रोगप्रतिबंधक लसींचे उत्पादक म्हणून या संस्थेची गणना होते. जगभरातील एकूण अर्भकांच्या संख्येपैकी ६० टक्क्य़ांहून अधिक अर्भकांचे संरक्षण या लसींमुळे होते. अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून दिली जाणारी हे वैशिष्टय़ असलेली लस जगातील तीनपैकी एका अर्भकाला दिली जाते. आरोग्य क्षेत्रातील या कार्याबद्दल पूनावाला यांना २००५ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते पद्मश्री किताबाने गौरविण्यात आले होते. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
जगातील सर्वात प्रभावी ७ व्हॅक्सीन अग्रणींपैकी एक अशा शब्दात बिल गेट्स यांनी पूनावाला यांची ओळख करून दिली आहे. अश्व शर्यती आणि अश्व उत्पादन क्षेत्रात डॉ. पूनावाला हे टर्फ अ‍ॅथॉरिटीज ऑफ इंडियाचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ टर्फ रेसिंग अ‍ॅथॉरिटीज या जागतिक शिखर समिती अध्यक्षांच्या हस्ते फ्रान्समध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे जगभरातील विविध सेवाभावी संस्थांना १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा अधिक रकमेच्या देणग्या दिल्या आहेत.