वेगाने काम करता यावे, तातडीने निर्णय घेता यावेत, यासाठी पिंपरी महापालिकेने वरिष्ठ अधिकाऱ्यांना महागडे लॅपटॉप खरेदी करून दिले. गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेचा हा ‘उपक्रम’ सुरू आहे. तथापि, मिळालेल्या लॅपटॉपचा वापर बहुतांश अधिकारी करत नसल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत, नव्याने ३२ लाख रूपयांचे नवे लॅपटॉप खरेदी करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या सर्व विभागांचे वर्ग एकचे अधिकारी, तसेच विभागप्रमुखांना लॅपटॉप देण्याची योजना २००४ पासून राबवण्यात येते. त्याअंतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी महागडे लॅपटॉप खरेदी करण्यात येतात. सुरूवातीच्या काळात ५० लॅपटॉप खरेदी करण्यात आले होते. मात्र, बहुतांश अधिकाऱ्यांनी त्याचा वापर केलाच नसल्याचे दिसून आले. त्यानंतर, अभियंत्यांनाही लॅपटॉप सुविधा पुरवण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आपले लॅपटॉप जुने झाले असून ते सतत नादुरुस्त होत असल्याचा तगादा काही अधिकाऱ्यांनी लावला व नव्या लॅपटॉपची मागणी केली. त्यानुसार, आता नव्याने लॅपटॉप खरेदी करण्यात येणार आहेत. त्यासाठी स्थायी समितीने ३२ लाख रूपये मंजूर केले आहेत. हा विषय आयत्यावेळी आणून मंजूर करण्यात आला. ठरावीक पुरवठादार डोळ्यासमोर ठेवून हा विषय मांडल्याचे सांगण्यात येते.