दवाखाने आणि रुग्णालयात सक्षम पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात कुचकामी ठरलेल्या आरोग्य यंत्रणेला सुविधांच्या नावाखाली केवळ खरेदी प्रक्रिया आणि उधळपट्टीत रस असल्याची वस्तुस्थिती आहे. यंत्रांचा अत्यल्प वापर होत असताना आणि एकच तंत्रज्ञ असतानाही आरोग्य विभागाने महागडय़ा सोनोग्राफी यंत्रांची केलेली खरेदी हे त्याचे उदाहरण देता येईल.

या यंत्रांचा दहा टक्केही वापर होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. मात्र त्याबाबत कोणाला कसलीही खंत नाही आणि यंत्रांचा वापर वाढविण्याचे प्रयत्नही होताना दिसत नाहीत. त्यामुळे कोटय़वधी रुपये किमतीची ही यंत्रे इस्पितळांमध्ये धूळ खात पडून आहेत.

महापालिकेच्या एकूण १६ दवाखान्यांमध्ये आणि  रुग्णालयांमध्ये सोनोग्राफी यंत्र बसविण्यात आली आहेत. या यंत्रांचा वापर नगण्य आहे. गेल्या चार वर्षांपासून सजग नागरिक मंचाने यंत्रांचा वापरच होत नसल्याचे अधिकाऱ्यांच्या सातत्याने निदर्शनास आणून दिले होते. सन २०१५—१६ या वर्षांत प्रत्येक यंत्रावर प्रत्येक महिन्यात केवळ २० केसेसची तपासणी करण्यात आली. सन २०१६—१७ मध्ये प्रत्येक महिन्यात प्रत्येक यंत्राद्वारे ३० केसेस तपासण्यात आल्या होत्या. याचाच अर्थ प्रत्येक महिन्याला प्रत्येक यंत्रावर सरासरी २० तपासण्या होत असल्याची कबुली आरोग्य विभागानेच दिली होती. खासगी रुग्णालयांत एका यंत्रावर एका महिन्यात ७०० केसेस तपासल्या जात असताना महापालिका रुग्णालयातील यंत्रांवर अपेक्षित तपासण्या का होत नाहीत, याची चर्चा सुरू झाली तेव्हा आरोग्य विभागाकडे केवळ एक रेडिऑलॉजिस्ट असल्याचे पुढे आले होते. स्त्रीरोग तज्ज्ञ केवळ गर्भाशी संबंधित तपासणी करत असल्यामुळे अन्य आजारांसाठी त्यांचा वापर होत नसल्याचे स्पष्ट झाले होते. जनतेच्या पैशांची अकारण उधळपट्टी करून सोनोग्राफी यंत्रे का घेण्यात आली, याचे ठोस उत्तर मात्र आरोग्य खात्याला आजही देता येत नाही. विशेष म्हणजे आजतागायत यंत्रांचा वापर दहा टक्केही नाही, याची कबुली अधिकारी देतात. यंत्रांचा वापर अत्यल्प होत असल्याचे पुराव्यानिशी समोर आले तेव्हा १६ रुग्णालये-दवाखान्यात बसविलेली यंत्रे दीडपट दराने खरेदी करण्यात आल्याचे उजेडात आले होते.

चौकशी नाही, विधानसभेचीही दिशाभूल

यंत्रांची चढय़ा दराने झालेली खरेदी आणि अत्यल्प वापराच्या पाश्र्वभूमीवर चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला होता. चौकशी अद्यापही गुलदस्त्यातच आहे. विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी ५०० रुग्ण या सेवेचा लाभ घेतात, असे सांगण्यात आले. मात्र सर्व यंत्रांवर मिळून दरमहा ५०० की एका यंत्रावर दरमहा ५०० ही आकडेवारी संदिग्ध ठेवली. वास्तवात प्रत्येक यंत्रावर दरमहा ३०८ रुग्ण तपासले गेले होते.

आरोग्य खात्याची अकार्यक्षमता आणि उधळपट्टी यातून पुढे आली होती. आजही सर्व १६ यंत्रे धूळ खात पडून आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

— विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच