30 May 2020

News Flash

पुरंदर विमानतळाबाबत प्रश्नचिन्ह

पुणे जिल्ह्य़ात विमानतळ होणारच आहे. त्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्य़ातील विमानतळाची घोषणा; ५०० कोटींची तरतूद, प्रस्तावित जागेविषयी मात्र मौन

पिंपरी : पुणे जिल्ह्य़ात विमानतळ होणारच आहे. त्यासाठी जवळपास ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जातील, त्या जागाबाधितांना रेडीरेकनरच्या चौपट दराने मोबदला दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मात्र विमानतळाची नियोजित जागा कोणती, याविषयी त्यांनी कोणतेच भाष्य केले नसल्याने याबाबतचे गूढ वाढले आहे. तसेच पुरंदर विमानतळाची प्रक्रिया सुरू झालेली असताना या नव्या घोषणेमुळे पुरंदर विमानतळाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

राजगुरुनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, की भाजप सरकारच्या पाच वर्षांच्या कालावधीत पुण्यासाठी विमानतळ होऊ शकले नाही. मात्र, नियोजित विमानतळ पुणे जिल्ह्य़ातच होणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून ५०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

यापूर्वीचे विरोधाचे राजकारण लक्षात घेता विमानतळाची नेमकी जागा कोणती आहे, हे आताच जाहीर करणार नाही, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. पुण्याच्या विमानतळासाठी ज्यांच्या जागा संपादित कराव्या लागणार आहेत, त्या शेतकऱ्यांना रेडीरेकनरच्या चारपट पैसे मोबदला म्हणून दिले जाणार आहेत. विमानतळ झालेच पाहिजे, यासाठी आपण आग्रही आहोत. विमानतळासाठी योग्य जागेची पाहणी संबंधित यंत्रणेकडून केली जाईल. त्यानंतर, इतर महत्त्वाची कामे सरकार म्हणून आम्ही करू. त्यानंतर विमानतळ संदर्भातील कार्यवाही कृतीतून दिसून येईल, असे पवार यांनी या वेळी सांगितले.

आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त

पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेबाबत सर्व परवानग्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला केंद्राकडून प्राप्त झाल्या आहेत. आता प्रकल्पग्रस्तांना द्यायचा मोबदल्यासह उर्वरित सर्व विषय राज्य सरकारच्या अखत्यारित आहेत. विमानतळ उभारणीची निविदा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर काढली जाणार आहे. नियोजन करण्यासाठी प्राधिकरण म्हणून एमएडीसी असेल. प्रत्यक्ष विमानतळ आणि इतर पूरक बांधकामासाठी नेमकी किती जागा लागेल, विमानतळाच्या परिसरात इतर विविध सुविधांच्या निर्मितीसाठी किती जागा लागेल, याचा आढावा विकास आराखडा करताना घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर विमानतळाची जागा बदलल्यास प्रयत्न फोल ठरण्याची शक्यता आहे.

‘गिरीश बापटांमुळे नुकसान’

भाजप सरकारमधील पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे मंत्रिमंडळात काहीच चालत नव्हते. त्यांच्या शब्दाला वजन नसल्याने कामे झाली नाहीत. परिणामी, पुणे जिल्ह्य़ाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना वीजजोडण्या मिळाल्या नाहीत, रस्तेविकासाची कामे खोळंबली, पाण्याचे नियोजन होऊ शकले नाही, जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध झाला नाही, अशी टीका अजित पवार यांनी बापट यांच्यावर केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2020 12:24 am

Web Title: purndar airport question mark akp 94
Next Stories
1 शहरातील तापमानात झपाटय़ाने बदल
2 कोरोना : व्हॉटस् अ‍ॅपवरील एका अफवेमुळे दररोज १० कोटी रूपयांना फटका
3 आई रागावल्याने घरातून निघून गेलेली १२ वर्षीय मुलगी, एका आजीमुळे परतली
Just Now!
X