31 March 2020

News Flash

त्रुटींमुळे ‘बीआरटी’चा बोऱ्या

बीआरटी मार्गाला निधी देताना सायकल मार्ग करणे बंधनकारक होते.

हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी करूनही उद्देश साध्य नाही

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा शाश्वत पर्याय म्हणून बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मधील त्रुटी पुढे आल्यानंतर त्या त्रुटी दूर करण्याऐवजी त्याकडे अक्षम्य दुर्लक्षच करण्यात आले आहे. त्रुटी दूर करण्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची उधळपट्टी १३ वर्षांत झाली. शहरात शंभरहून अधिक किमी लांबीचे बीआरटी मार्गाचे जाळे विकसित करण्यासाठी तत्कालीन केंद्र सरकारकडून १ हजार ३०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र, हा निधी अन्य कामांसाठी वापरण्याचा प्रकार सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केल्याचे चित्र पुढे आले आहे. त्यामुळे जलदगती प्रवासही कागदावरच राहिला असून बीआरटी मार्ग साधे मार्ग झाल्याचे दिसून येत आहे.

खासगी वाहनांची वाढती संख्या, प्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्याबरोबरच सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी तेरा वर्षांपूर्वी बीआरटी हा पर्याय महापालिकेने स्वीकारला. तत्कालीन काँग्रेस सरकारने शहरात ११८ किलोमीटर लांबीचे जाळे निर्माण करण्यासाठी हजारो कोटी रुपये देण्याचे निश्चित केले. तत्कालीन जवाहरलाल नेहरू नागरी राष्ट्रीय पुनरुत्थान योजनेअंतर्गत हा एक हजार ३०० कोटी रुपयांचा निधी या महापालिकेला प्राप्त झाला. पण हा निधी नक्की कुठे गेला, कोणत्या कामांसाठी तो खर्च झाला, याची कोणतीही माहिती पीएमपी आणि महापालिकेकडे नसल्याची वस्तुस्थिती आहे.

बीआरटी मार्गाला निधी देताना सायकल मार्ग करणे बंधनकारक होते. त्यानुसार सायकल मार्गाची उभारणी काही ठिकाणी केली. मात्र, त्याचा वापर होऊ शकला नाही ना त्या मार्गावरून पुणेकरांना जलदगती सेवेचा लाभ घेता आला नाही. कालांतराने सायकल मार्गाच्या दुरुस्तीसाठी त्याची मोडतोड करण्यात आली. वाढत्या वाहतुकीमुळे रस्ते अपुरे पडत असल्यामुळे काही मार्गावरील सायकल मार्ग आणि सेवा रस्तेच बीआरटी मार्गात समाविष्ट करण्याचा प्रकार करण्यात आला आहे. सातारा रस्ता हे त्याचे उदाहरण आहे. त्यामुळे बीआरटीच्या मूळ निकषालाही हरताळ फासला गेल्याचे चित्र आहे.

राखीव बस मार्गिका, समपातळीवर बसथांबे, रुंद दरवाजे, बंदिस्त बसस्थानके, विशिष्ट प्रकारच्या भरपूर गाडय़ा, प्रवासी माहिती प्रणाली, वाहन ट्रॅकिंग सिस्टिम, स्वयंचलित प्रणाली, प्रवाशांना सोयीसाठी ट्रान्सफर स्टेशन, टर्मिनल आणि डेपो या सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. त्यापैकी काही ठिकाणी सुविधा सुरू आहेत, तर काही ठिकाणच्या सुविधा पूर्णपणे बंद आहेत. या त्रुटी निदर्शनास आल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे तेरा वर्षांत निधी असूनही बीआरटी सक्षमीकरण होऊ शकलेले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

बीआरटी मार्गातून जलदगती सेवा देता येत नसल्यामुळे आता हा मार्गही सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. आळंदी रस्त्यावरच काही किलोमीटर अंतरावर बीआरटी सेवा सुरू आहे. अन्य मार्गावर खासगी वाहतूक बीआरटी मार्गातून होत असल्याचे चित्र आहे. अपूर्ण आणि रखडलेली कामे, कामांमुळे होत असलेली वाहतूक कोंडी आदी कारणांमुळे लोकप्रतिनिधींनीही हे मार्ग सर्व वाहनांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीआरटी मार्गातील त्रुटी निदर्शनास आल्यानंतर त्या दूर करण्याऐवजी या कामासाठी राखीव असलेला निधी वर्ग करण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनीही मंजूर करून घेतला आहे. बीआरटीच्या निधीतून प्रभागातील किरकोळ कामे नगरसेवकांनी करून घेतली आहेत, तर अधिकाऱ्यांनीही या योजनेचा निधी अन्य प्रकल्पांसाठी वापरला आहे. त्यामुळे मूळ बीआरटी मार्गाला निधी मिळूनही त्यासाठीचा अतिरिक्त खर्च महापालिकेलाच  करावा लागला आहे.

नव्याने बीआरटी मार्गाना प्राधान्य

बीआरटी मार्ग पूर्णपणे अपयशी ठरले असतानाही आगामी वर्षांत काही नव्याने मार्ग विकसित करण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. गणेशखिंड रस्ता, जुना पुणे-मुंबई रस्ता, पाटील इस्टेट ते संगमवाडी या मार्गावर एकूण पंधरा किलोमीटर लांबीचे बीआरटी मार्ग प्रस्तावित आहेत. त्यासाठी आगामी अंदाजपत्रकात बारा कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सातारा रस्त्याच्या सक्षमीकरणासाठी अंदाजपत्रकात पुन्हा सात कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:12 am

Web Title: purpose is not achieved even scrapping thousands crores orupees akp 94
Next Stories
1 उड्डाण पुलाखाली बेकायदा व्यवसाय
2 भेटकार्डे, केक, कल्पक वस्तूंना पसंती
3 शरद पवारांवर पीएचडी करण्याची इच्छा : चंद्रकांत पाटील
Just Now!
X