पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा १२ ऑगस्टपासून सुरू होणार असून स्पर्धेचे अर्ज १४ आणि १५ जुलैला मिळणार आहेत.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या वतीने दरवर्षी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा आयोजित करण्यात येते. या वर्षी १२ ते २७ ऑगस्ट दरम्यान भरतनाटय़ मंदिर येथे प्राथमिक फेरी होणार आहे. ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर या दिवशी अंतिम फेरी होणार आहे. स्पर्धेचे अर्ज १४ आणि १५ जुलैला सायंकाळी ६ ते ८ या वेळेत संस्थेच्या सुभाषनगर येथील कार्यालयात मिळणार आहेत. या स्पर्धेत गेल्या वर्षी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यात येणार असून नव्याने भाग घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयांची प्रतीक्षा यादी तयार करून त्यानुसार प्रवेश देण्यात येईल. अर्ज नेताना महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी प्राचार्याचे पत्र आणणे आवश्यक आहे, असे संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी कळवले आहे.