महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले ‘तीन पैशाचा तमाशा’ हे नाटक लवकरच पुन्हा एकदा रंगमंचावर येत आहे. या नव्या प्रयोगाचे वैशिष्टय़ म्हणजे दृष्टिक्षीणतेपासून ते दृष्टिहीनतेपर्यंत अंधत्वाचे विविध प्रकार असलेले २२ कलाकार या प्रयोगामध्ये अभिनय करीत आहेत. सध्या या नाटकाच्या रंगीत तालमी सुरू असून लवकरच ते रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे.

पुलंचा मंगळवारी (१२ जून) स्मृतिदिन. हे औचित्य साधून रश्मी पांढरे आणि वीणा ढोले यांच्या आरलीन संस्थेने ‘तीन पैशाचा तमाशा’ पुन्हा रंगभूमीवर येत असल्याची माहिती दिली. त्यासाठी त्यांना ‘साबी फाउंडेशन’ या संस्थेचे सहकार्य लाभले आहे. या निर्मात्याद्वयींनी यापूर्वी गणेश दिघे यांच्या ‘अपूर्व मेघदूत’ या १९ दृष्टिहीन कलाकारांच्या भूमिका असलेल्या नाटकाची निर्मिती केली होती.

‘अपूर्व मेघदूत’चे दिग्दर्शन करणारे स्वागत थोरात यांनी ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटकाच्या तालमीमध्ये गौरव घायले, अद्वैत मराठे, विकी शेट्टी, सुंदर सोंडस, प्रवीण पाखरे, सौरभ चौगुले, प्रवीण पालके, संतोष कसबे, राम भोईटे, फईम तांबोळी, स्वप्नील पाटील, रामकृष्ण घुले, रूपाली यादव, तेजस्विनी भालेकर, मेघा पाटील, आरती ढगे, शीतल चव्हाण, बेला सोंडे, प्राजक्ता डफळ, हेमांगी धामणे असे दृष्टिहीन कलाकार सहभागी झाले आहेत. नाटकाची तांत्रिक बाजू सचिन ठाकूर, प्रशांत कांबळे, ऋचा पाटील, वृषाली बोरावके हे सांभाळत असून, वनिता देशपांडे कार्यकारी निर्मात्या म्हणून काम करत आहेत. या नाटकामध्ये बारा गाणी असून बिपीन वर्तक यांनी संगीत दिले आहे. अरिवद हसबनीस यांनी संगीत संयोजन केले आहे. राधा मंगेशकर, शरयू दाते, शंतनू हेर्लेकर, बिपीन वर्तक आणि अरिवद हसबनीस यांच्या आवाजात ही गीते स्वरबद्ध करण्यात आली आहेत. २४ जून रोजी या नाटकातील गाण्यांच्या सीडीचे प्रकाशन होणार असल्याची माहिती रश्मी पांढरे यांनी दिली.

तिसऱ्यांदा रंगभूमीवर

थिएटर अ‍ॅकॅडमीने पुलंच्या ‘तीन पैशाचा तमाशा’ नाटकाचा पहिला प्रयोग २५ जून १९७८ रोजी पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे केला होता. डॉ. जब्बार पटेल यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. त्यानंतर २००० मध्ये स्वागत थोरात यांनी ‘यशोगाथा’ संस्थेतर्फे हे नाटक रंगमंचावर आणले होते. त्यामध्ये ४४ दृष्टिहीन कलाकारांनी काम केले होते. आता ‘तीन पैशाचा तमाशा’ तिसऱ्यांदा रंगमंचावर सादर होणार आहे.