महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या कलाजीवनातील मानाचे पान असलेल्या आणि यंदा पन्नाशीची उमर गाठलेल्या ‘पुरुषोत्तम करंडक स्पर्धे’ला राजाश्रय मिळावा यासाठी सरकारदरबारी साद घातली जाणार आहे. साहित्यसंमेलन आणि नाटय़संमेलनाला दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या धर्तीवर पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून खास बाब म्हणून राज्य सरकारकडून निधी मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आला आहे.
‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे कार्यकारिणी सदस्य राजेंद्र नांगरे यांनी ही माहिती दिली. संस्थेतर्फे पुरुषोत्तम करंडक ही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जात असून ही स्पर्धा यंदा सुवर्णमहोत्सवी टप्पा गाठत आहे. यानिमित्ताने वर्षभर विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी संस्थेला आर्थिक निधीची आवश्यकता आहे. विधानसभा आणि विधान परिषद सदस्यांना दिला जाणारा निधी जिल्हा नियोजन समितीमार्फत विविध सामाजिक कामांसाठी वितरित केला जातो. यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश करण्यात आलेला नसल्यामुळे आमदारांच्या निधीचा फायदा सांस्कृतिक कार्यक्रमांना होत नाही. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला खास बाब म्हणून विचारात घेऊन मुख्यमंत्री निधी किंवा आमदार निधीतून काही रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे, असेही कोंढरे यांनी सांगितले. राज्याच्या सांस्कृतिक राजधानीत पुरुषोत्तम करंडकसारखी स्पर्धा गेली पाच दशके सातत्याने होत आहे. या स्पर्धेला लोकाश्रय मिळत असला तरी राजाश्रय मिळण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
उत्तमोत्तम एकांकिका पुरुषोत्तमच्या
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेतील लेखनाचे पारितोषिक मिळालेल्या निवडक ३२ एकांकिकांचा ‘उत्तमोत्तम एकांकिका पुरुषोत्तमच्या’ हा दोन खंडांचा संग्रह साकारला गेला आहे. या संग्रहाचे प्रकाशन रविवारी (३ ऑगस्ट) बीएमसीसीच्या टाटा सभागृहामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. प्रकाशन कार्यक्रमानंतर डेक्कन जिमखाना ते भरत नाटय़ मंदिर अशी ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक काढण्यात येणार आहे. महापौर चंचला कोद्रे, रंगकर्मी दीपक राजाध्यक्ष, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आनंद भिडे यांच्यासह नाटय़-चित्रपट कलाकार आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत, अशी माहिती संस्थेचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी दिली. ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मास्टर क्लास घेणार आहेत. नाटकाच्या विषय निवडीपासून ते सादरीकरणापर्यंतचा प्रवास ते उलगडून दाखविणार आहेत.