वाचनालयापासून लांब राहणाऱ्या वाचकांना चांगली पुस्तके मिळावीत म्हणून सुरू करण्यात आलेला ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम आता येरवडा कारागृहातही पोहोचणार असून, त्याद्वारे तेथील कैद्यांसाठी चांगली पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पुस्तकांपासून लांब असलेल्या किंवा व्यग्रतेमुळे वाचनालयापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांसाठी नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे राज्यभर ‘ग्रंथ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येतो. त्याद्वारे एका भागात शंभर पुस्तकांचा समावेश असलेली ‘पुस्तक पेटी’ दिली जाते. सर्व पेटय़ांमध्ये वेगवेगळी पुस्तके असतात. या पेटय़ा चार महिन्यांनंतर बदलल्या जातात. त्यामुळे वाचकांना वेगवेगळी पुस्तके वाचायला मिळतात. त्यात कथा, कादंबरी, व्यक्तिचरित्र, रहस्य, ऐतिहासिक, विनोदी व अनुवादित अशी विविध प्रकारची आणि लेखकांची पुस्तके असतात. राज्यातील विविध भागाप्रमाणेच गुजरातमध्ये बडोदे, अहमदाबाद, सूरत, नवसारी तसेच, दिल्ली, गुडगाव येथेही हा उपक्रम चालवला जातो. अशा एकूण ३८५ पुस्तक पेटय़ा विविध ठिकाणी असून, त्याद्वारे ७५ लाख रुपयांची पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
याशिवाय कारागृहातील कैद्यांना वाचण्यासाठी दर्जेदार साहित्य मिळावे यासाठी हा उपक्रम नाशिक व ठाणे कारागृहात सुरू करण्यात आला आहे. तिथे कैद्यांचा चांगली प्रतिसाद मिळत असल्याने हा उपक्रम येत्या शनिवारपासून (१९ ऑक्टोबर) येरवडा कारागृहात सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक रानडे यांनी दिली. याशिवाय पुण्यातील पुस्तक पेटय़ांमध्ये वाढ करून त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.