||  शिवाजी खांडेकर

२०१५, २०१६ चे कामगार पुरस्कार लवकरच

पिंपरी : राज्यातील गुणवंत कामगार पुरस्कारांची (२०१५ आणि २०१६) घोषणा होऊन चार वर्ष उलटूनही पुरस्कारांचे वितरण अद्याप करण्यात आलेले नाही. मात्र पुरस्कार वितरण होण्याची चिन्ह दिसत आहेत. कामगार कल्याण मंडळाला आता जाग आली असून पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठीची आवश्यक प्रक्रिया मंडळाकडून सुरू करण्यात आली आहे. तसेच पुरस्कार विजेते कामगार त्या त्या कंपनीत आहेत ना, याचाही शोध घेतला जात आहे. गुणवंत कामगार पुरस्कार चार वर्षांत दिले गेले नसल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने ९ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले होते. हा समारंभ आयोजित करण्यासंबंधीची पत्रे आता संबंधित कंपन्यांच्या व्यवस्थापनाला पाठवण्यात आली आहेत. पुरस्कार वितरणाचा सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचे त्या पत्रातून कळवण्यात आले आहे.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने ज्या ज्या कंपन्यांमधील कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे, त्या कामगारांची सद्य:स्थिती जाणून घेण्यासाठी पत्रव्यवहार सुरू केला आहे. कामगार सद्य:स्थितीत संबंधित कंपनीत आहे किंवा कसे तसेच त्यांचा संपर्कासाठीचा पत्ता आणि मोबाइल क्रमांकाची माहिती मंडळाने मागविली आहे. पुरस्काराचे वितरण लवकरच करण्यात येणार असल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडून दरवर्षी राज्यातील ५० कामगारांना ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ आणि एका कामगाराला ‘कामगारभूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते.

‘गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारा’साठी एखाद्या कंपनीमध्ये कमीत कमी पाच वर्ष सेवा झालेली असणे अपेक्षित आहे, तर ‘कामगारभूषण पुरस्कारा’साठी गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये दहा वर्ष सेवा झालेली असणे अपेक्षित आहे. पुरस्कारासाठी कामगारांकडून दरवर्षी डिसेंबर महिन्यात रितसर अर्ज मागविण्यात येतात. त्यानंतर कामगारांची मुलाखत घेतली जाते. मुलाखत प्रक्रियेनंतर कामगार कल्याण मंडळाच्या निवड समितीकडून कामगारांची निवड करून पुरस्कार विजेत्या कामगारांची घोषणा केली जाते.

पुरस्काराचे स्वरूप

कामगारभूषण पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे, तर गुणवंत कामगार पुरस्काराचे १५ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे आहे. संबंधित कंपनीकडूनही कुटुंबासह पुरस्कार विजेत्या कामगारांचा विशेष सन्मान केला जातो. तसेच पुरस्काराचे वितरण झाल्यानंतर कामगाराला पगारवाढ दिली जाते.

सन २०१५ या वर्षीच्या गुणवंत कामगार पुरस्कारासाठी माझी निवड झाली आहे. त्याबाबतचे पत्र कामगार कल्याण मंडळाकडून मला आले होते. परंतु गेल्या चार वर्षांत पुरस्काराचे वितरण झाले नाही. नव्याने पत्र आले असून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम लवकरच करण्यात येणार असल्याचा उल्लेख त्या पत्रात आहे.

– दत्तात्रय येळवंडे, २०१५ मधील        गुणवंत कामगार पुरस्कार        विजेते,  पिंपरी