रांगा कायम; पण सामान्यांच्या..

पाचशे, हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयाला आठवडा उलटून गेला, तरी बँका, पोस्ट ऑफिस आणि एटीएम समोरील रांगा संपण्याची चिन्ह नाहीत. या निर्णयाचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकावर झाल्याचे सांगितले जात असले, तरी या रांगांमध्ये कुठेही ‘सेलिब्रेटी’, धनाढय़ व्यापारी, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक, राजकीय नेते, विविध पक्षांचे पुढारी अद्याप कोणालाही दिसलेले नाहीत.

नोटा बदलून घेण्यासाठी तसेच घरातील पाचशे, हजाराच्या नोटा बँकेत भरण्यासाठी आणि एटीएममधून रक्कम काढण्यासाठी सध्या शहरात सर्वत्र रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. सर्व ठिकाणी लागणाऱ्या या रांगांमध्ये सर्वसामान्य नागरिक, नोकरदारवर्ग, गृहिणी, कामगार वर्ग, ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचारी, भाजीपाला विक्रेते, रिक्षाचालक, फेरीवाले, किरकोळ विक्रेते तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उभे असल्याचे दिसत आहे. मात्र विविध क्षेत्रातील नामवंत मंडळी, राजकीय नेते, नगरसेवक, आमदार हे कोणत्याही रांगेत उभे असल्याचे कोणालाही अद्याप दिसलेले नाही. त्याची चर्चाही रांगांमध्ये ऐकायला मिळत आहे.   रांगांमध्ये उभ्या राहणाऱ्या नागरिकांसाठी अनेक बँकांनी बँकांच्या कार्यालयांपुढे तसेच एटीएमसमोर मंडप उभारले आहेत. काही बँकांतर्फे रांगेतील नागरिकांसाठी चहा-पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तिवेतन बँकेतून रोख रक्कम स्वरूपात मिळाले होते. त्यामुळे ती रक्कम बदलून घेण्यासाठी त्यांना रांगेत उभे राहावे लागू नये यासाठी स्वतंत्र सोय देखील करण्यात आली आहे. ज्यांना नोटा बदलताना दोन हजार रुपयाच्या नोटा मिळाल्या आहेत, ते देखील बँकेसमोरील रांगेत उभे राहत आहेत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी तास न् तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तसेच इंटरनेट बँकिंगही सुरळीत होत नाही. त्यामुळे त्या माध्यमातून व्यवहार करणाऱ्यांचेही हाल होत आहेत. काही ठिकाणी राजकीय पक्ष वा संघटनांतर्फे रांगांमधील नागरिकांसाठी काही ना काही सोयी वा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मात्र राजकीय मंडळी वा नेते वा विविध क्षेत्रातील प्रसिद्ध मंडळी रांगेत उभे असल्याचे दिसत नाही.