राष्ट्रीय परीक्षा मंडळाने (एनटीए) सप्टेंबरच्या जेईई मुख्य (मेन्स) परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांच्या गुणांचे पर्सेटाइलमध्ये रूपांतर करताना चुकीचे सूत्र वापरल्याने विद्यार्थ्यांचे पर्सेटाइल कमी झाल्याचे विद्यार्थी, पालक, तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे जेईई मेन्सच्या निकालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

‘जेईई मेन्सच्या जानेवारीतील परीक्षेच्या तुलनेत सप्टेंबरमधील परीक्षेच्या निकालात गुण वाढले आहेत. मात्र, पर्सेटाइल कमी झाले आहेत. सर्वसाधारणपणे जानेवारीच्या तुलनेत किमान एक ते पाच पर्सेटाइल कमी झाले आहेत. एनटीएच्या नमुना उत्तरपत्रिके नुसार जानेवारीच्या परीक्षेच्या निकालातील पर्सेटाइलइतके च गुण मिळतील असे दिसून येत होते. मात्र, प्रत्यक्ष निकालात तसे झाले नाही. कारण जानेवारीच्या तुलनेत सप्टेंबरमधील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे आणि सत्रनिहाय विद्यार्थ्यांची संख्याही कमी होती. त्याचा विचार एनटीएने केल्याचे दिसत नाही,’ असे काही विद्यार्थी आणि पालकांनी सांगितले.

तज्ज्ञ मार्गदर्शक दुर्गेश मंगेशकर म्हणाले, की जेईई मेन्सच्या जानेवारीच्या तुलनेत सप्टेंबरच्या परीक्षेच्या निकालात विद्यार्थ्यांचे गुण वाढले आहेत. मात्र, पर्सेटाईल घटले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे जानेवारीचेच गुण जास्त आहेत. कारण एनटीएने पर्सेटाइल काढण्यासाठी वापरलेले सूत्र चुकीचे आहे. त्यामुळे निकालात गडबड झाली आहे. हा धक्कादायक प्रकार आहे. देशभरातील विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे. पर्सेटाइल काढताना सप्टेंबरच्या परीक्षेला अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना विचारात घेऊन पर्सेटाइल काढले पाहिजे. एनटीएने हा निकाल सुधारण्याची गरज आहे. या संदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री, एनटीएला सविस्तर ई मेल पाठवला आहे, असेही त्यांनी सांगितले.