दहशतवादविरोधी पथक आणि स्थानिक पोलीस यांच्या सुरक्षाविषयक प्रात्याक्षिकांमध्ये दगडूशेठ गणपती मंदिराची सुरक्षाव्यवस्था संपूर्णपणे नापास झाली आहे. या मंदिरात दहशतवाद्याची भूमिका वठवणारी एक व्यक्ती बनावट बॉम्ब आणि पिस्तूल घेऊन चाळीस मिनिटे फिरली. पण, येथील सुरक्षायंत्रणांना त्याचा थांगपत्ता लागला नाही. याबाबत एटीएसने स्थानिक पोलिसांना अहवाल दिला आहे.
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा २६/११ चा स्मृतिदिन आणि दहशतवादी हल्ल्यांबाबत गुप्तचर यंत्रणांकडून येणारे इशारे या पाश्र्वभूमीवर एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी शुक्रवारी दगडूशेठ मंदिरात सुरक्षाविषयक पाहणी केली. त्यांनी बनावट बॉम्ब असलेली बॅग व पिस्तूल घेऊन एका व्यक्तीला मंदिरात पाठवले. या व्यक्तीने मंदिरातील मेटल डिटेक्टर व तपासणी यंत्रणा ओलांडून मंदिरात प्रवेश केला. बॉम्ब असलेली बॅग मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या बॅगा ठेवायच्या ठिकाणी ठेवली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ही व्यक्ती मंदिरात संशायस्पद हलचाली करीत होती. मात्र, या व्यक्तीकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. ती मंदिरात तो तब्बल चाळीस मिनिटे फिरत होती. तरीही सुरक्षायंत्रणांना हा प्रकार समजला नाही. याबाबत एटीएसने विश्रामबाग पोलिसांना दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षाविषयक त्रुटींचा अहवाल दिला आहे. तसेच, येथील सुरक्षायंत्रणांची चांगलीच कानउघडणीसुद्धा केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. ही तपासणी एटीएसचे पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे आणि अशोक वांजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच, पुणे स्टेशन या ठिकाणी केलेल्या तपासणीतही तेथील सुरक्षाव्यवस्था व्यवस्थित नसल्याचे आढळून आले आहे.
दगडूशेठ मंदिर परिसर पूर्णपणे सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली आहे. या ठिकाणी मंदिराच्या सुरक्षितेबरोबरच पोलिसांची सुद्धा सुरक्षाव्यवस्था आहे. या मंदिरापासून काही मीटर अंतरावर असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या पार्किंगमध्ये गेल्याच जुलै महिन्यात बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर पोलीस ठाण्याची सुरक्षा वाढविली आहे. पण, मंदिराच्या सुरक्षाव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाले आहे. जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या दिवशी, १३ फेब्रुवारी २०१० रोजी कतिल सिद्दीकी या दहशतवाद्याने दगडूशेठ मंदिरात बॉम्ब असलेली बॅग ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ती बॅग फुल विक्रेत्याने ठेवून न घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आले होते.