येरवडा मनोरुग्णालयात बुधवारी रात्री एका मनोरुग्णाच्या हल्ल्यात इतर दोन मनोरुग्णांचा बळी गेल्यानंतर रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात डॉक्टर्स आणि परिचारकांच्या कमतरतेबरोबरच रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी पुरेसे अटेंडंटस् नाहीत. १६ वॉर्डाच्या या मनोरुग्णालयात कुठे काय चालले आहे हे पाहण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारख्या तांत्रिक सुविधांचा मागमूसही नाही.
येरवडा मनोरुग्णालयातील रुग्णांच्या स्वच्छतेसाठीचे पाणी, कपडे अशा रोजच्या जीवनातील गोष्टींसाठी झालेली केविलवाणी अवस्था ‘लोकसत्ता’ ने सर्वप्रथम ‘येरवडय़ाचा नरक’ या मालिकेतून मांडली होती. यानंतर गेल्या महिन्यात प्रशासनाने खडबडून जागे होऊन रुग्णालयाला भेटही दिली होती. या भेटीनंतरही रुग्णालयातील परिस्थिती बदलल्याचे चित्र नाही. परंतु जीवनावश्यक गोष्टींबरोबरच रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर असल्याचेच पुन्हा अधोरेखित झाले आहे.
नव्याने दाखल झालेल्या पुरूष रुग्णांच्या कक्षात बुधवारी रात्री एका मनोरुग्णाने रागाच्या भरात दोन मनोरुग्णांवर हल्ला केला. परंतु या वेळी कक्षात अटेंडंट उपस्थित नव्हता. विशेष बाब म्हणजे पुरूष रुग्णांच्या वॉर्डात रात्री बुधवारी ७० रुग्णांमागे केवळ ३ अटेंडंटस् होते.  
रुग्णालयात सध्या ९५० पुरूष रुग्ण व ७०० स्त्री रुग्ण मिळून एकूण १६५० रुग्ण आहेत. या सर्व रुग्णांमागे ५२४ अटेंडंटस्च्या जागा भरलेल्या आहेत. परंतु कालच्या घटनेनंतर रुग्णालयात एका वेळी ६५ ते ७० रुग्णांमागे केवळ ३ ते ४ अटेंडंटस् उपस्थित असतात ही बाब उघड झाली आहे. रुग्णालयाच्या प्रभारी अधीक्षक डॉ. मधुमिता बहाले म्हणाल्या, ‘‘अटेंडंटस् थोडय़ा- थोडय़ा वेळाने वॉर्डात फेऱ्या मारतात, आणि एखादा रुग्ण गडबड करीत असेल तर त्याच्याकडे लक्ष ठेवतात. रुग्णही अशा घटनांबाबत सजग असतात व ते असे काही आढळल्यास लगेच अटेंडंटस् व डॉक्टरांना बोलवतात. मनोरुग्ण अचानक किरकोळ कारणावरून रागावल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या असून त्यात रुग्ण दगावल्याच्याही घटना घडलेल्या आहेत. साधारणपणे वर्षांला अशी एखादी घटना घडल्याचे दिसून येते.रुग्णालयात अटेंडंटस्ची संख्या कमी आहे व ती वाढवणे आवश्यक आहे. अशा घटनांमध्ये रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या जिवालाही धोका होऊ शकतो. रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा यासाठी रिक्त जागा भरण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.’’
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याविषयीचा प्रस्ताव गेल्या महिन्यात मंजूर झाला असल्याचे डॉ. बहाले यांनी सांगितले. सध्या रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नाहीत. त्यामुळे रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी केवळ वॉर्डात काही वेळाने फेरी मारणे, वॉर्डातून आवाज आल्यास लक्ष देणे अशाच मार्गाचा अवलंब केला जातो.

येरवडा मनोरुग्णालयातील रिक्त पदांची आकडेवारी-
खाते                       रिक्त पदे  
अटेंडंट                    १०३  
परिचारक व लिपिक वर्ग    ४१
अधीक्षक व डॉक्टर         १०
कार्यालयीन कर्मचारी         ५

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
stock market, 3 7 crore dmat accounts
सरलेल्या आर्थिक वर्षात ३.७ कोटी डिमॅट खात्यांची भर
cashless health insurance
‘कॅशलेस’ आरोग्य विम्याला डॉक्टरांचा विरोधच! जाणून घ्या कारणे…