१९४२च्या लढय़ातील पुण्याचा पहिला हुतात्मा

गवालिया टँकवरून महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘चले जाव’चा दिलेला इशारा.. त्याच रात्री गांधीजी, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद या नेत्यांना स्थानबद्ध करून नगरच्या तुरुंगात केलेली रवानगी.. दुसऱ्याच दिवशी काँग्रेस भवनवर तिरंगा फडकाविण्यास गेलेल्या शाळकरी मुलांवर इंग्रजांनी केलेल्या गोळीबारात हौतात्म्य पत्करलेले १७ वर्षीय युवक नारायण दाभाडे.. क्रांती दिनाचे औचित्य साधून बुधवारी (९ ऑगस्ट) ‘चले जाव’ आंदोलनाची अमृतमहोत्सव पूर्ती होत असताना १९४२ च्या लढय़ात पुण्यातील पहिला हुतात्मा अशी इतिहासामध्ये नोंद असलेले नारायण दाभाडे यांच्या हौतात्म्याचे स्मरण होणे स्वाभाविक आहे.

महात्मा गांधी यांनी मुंबईतील गवालिया टँक मैदानात झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात ८ ऑगस्ट १९४२ रोजी ‘चले जाव’चा इशारा दिला. त्याच दिवशी गांधीजींसह प्रमुख नेत्यांना अटक केली गेली. नेते तुरुंगात असले तरी नारायण दाभाडे या पुण्यातील कार्यकर्त्यांने न्यू इंग्लिश स्कूलमधील आपल्या मित्रांसमवेत मोर्चा काढला. दाभाडे यांनी खऱ्या अर्थाने या आंदोलनाला पुण्यातून सुरुवात केली. या मोर्चाला इंग्रजांनी अडविले. परंतु, तरीही त्यांनी काँग्रेस भवनवर तिरंगा फडकाविला. पण, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात नारायण दाभाडे हुतात्मा झाले. क्रांती दिनाच्या अमृतमहोत्सव पूर्तीचे औचित्य साधून ठिकठिकाणी कार्यक्रम होत असताना नारायण दाभाडे यांच्या हौतात्म्यालाही ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे शहर काँग्रेस आणि नारायण दाभाडे स्मारक समितीतर्फे चले जाव आंदोलनातील पहिले हुतात्मा नारायण दाभाडे यांचा पुतळा काँग्रेस भवन येथे उभारण्यात आला असून त्याचे अनावरण डिसेंबर २००५ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते झाले होते.

नारायण दाभाडे यांच्या कर्तृत्वाविषयी काँग्रेस भवनामधील तिरंगा फडकविण्याच्या आंदोलनात सहभाग घेतलेले त्यांचे धाकटे बंधू सुरेश दाभाडे यांनी लेख लिहिला होता, अशी आठवण दाभाडे यांचे पुतणे धनंजय दाभाडे यांनी सांगितली. महात्मा गांधी यांचा आदेश वंद्य मानून नारायण दाभाडे यांनी सविनय कायदेभंगाची सुरुवात काँग्रेस भवन येथे करण्याचा निर्धार केला. कसबा पेठेतून मोर्चा काढून काँग्रेस भवन येथे नारायण दाभाडे यांनी तिरंगा फडकवायचा असे ठरले. इंग्रजांनी १४४ कलम लावल्यामुळे संपूर्ण पुणे शहर बंद होते. काँग्रेस भवन येथील सभेनंतर झेंडा फडकविण्यासाठी नारायण पुढे सरकू लागले, तेव्हा इंग्रजांनी गोळीबार करण्याची धमकी दिली. परंतु, तरीही नारायण ऐकेना. पोलिसांशी झटापट करून नारायण काँग्रेस भवनच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचले, तोपर्यंत त्यांच्या पायाला आणि दंडाला गोळी लागली होती. इंग्रजांचा युनियन जॅक फाडून तेथे नारायण यांनी तिरंगा लावला, त्या वेळी कमिशनर हॅमडने छातीत गोळी मारली. ती छातीला भोक पाडून पाठीला लागली. धारातीर्थी पडलेल्या नारायण यांचा तिरंगा लावून झाला होता आणि ‘भारतमाता की जय’ अशी घोषणा देत त्यांनी हौतात्म्य पत्करले, असे धनंजय दाभाडे यांनी सांगितले.

हुतात्म्याच्या शौर्याचे नाटय़दर्शन

क्रांती दिनाच्या पंचाहत्तर वर्षांपूर्तीनिमित्त हुतात्मा नारायण दाभाडे यांच्या बलिदानाचा रोमहर्षक प्रसंग इतिहासप्रेमी मंडळातर्फे नाटय़रूप दर्शनातून साकारण्यात येणार आहे. काँग्रेस भवन येथे बुधवारी (९ ऑगस्ट) दुपारी तीन वाजता हा प्रसंग पुन्हा नाटय़रूपाने जिवंत होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी सांगितले.