गायनाबरोबरच संगीत रंगभूमी, चित्रपट आणि संगीत महोत्सवाचे संयोजक अशा वेगवेगळ्या भूमिकांतून रसिकांपर्यंत पोहोचलेले लोकप्रिय युवा गायक राहुल देशपांडे यांच्याशी शुक्रवारी (१७ जुलै) गप्पा रंगणार आहेत. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमामध्ये प्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. सायंकाळी पाच वाजता हा दूरचित्र संवाद होणार आहे.

‘माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं’ असे अभिमानाने सांगणारे ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू असलेल्या राहुल देशपांडे यांनी आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकी आणि अभिनयाने रसिकांच्या स्मरणात राहिलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या संगीत नाटकाचे पुनरुज्जीवन करताना वसंतराव यांनी अजरामर केलेली ‘खाँसाहेब’ यांची भूमिका त्यांनी या नाटकातून साकारली. संगीत रंगभूमीवर मानाचे पान ठरलेल्या ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत मानापमान’ या नाटकांचे राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवन केले आहे.

उषा चिपलकट्टी, पं. गंगाधरबुवा पिंपळखरे आणि पं. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे राहुल देशपांडे यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र यांच्याकडून त्यांना तालीम मिळाली. दूरचित्रवाणीवरील ‘सूर ताल’ आणि ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाद्वारे अफाट लोकप्रिय झालेल्या राहुल देशपांडे यांच्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, सिंगापूर आणि अमेरिकेमध्ये संगीत मैफिली झाल्या आहेत.

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या काही वर्षांपासून राहुल देशपांडे ‘वसंतोत्सव’चे आयोजन करीत आहेत. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती राहुल देशपांडे यांनी केली असून त्यामध्ये त्यांनी वसंतरावांची भूमिका साकारली आहे.

‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात प्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे हे राहुल देशपांडे यांच्याशी संवाद साधणार आहेत. ‘डॉ. अशोक दा. रानडे संगीत अर्काइव्ह’च्या माध्यमातून कुंटे नावीन्यपूर्ण सांगीतिक उपक्रम राबवीत असतात.

वेबसंवादात सहभागी होण्यासाठी इतके च करा..

* https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_17July या लिंकवर जाऊन नोंदणी करा.

* नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून तुम्हाला ई मेल आयडीवर संदेश येईल.

* याद्वारे १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता या वेब संवादात सहभागी होता येईल.

* अधिक माहितीसाठी  https://loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.