06 August 2020

News Flash

लोकप्रिय युवा गायकासमवेत शब्दमैफील

‘सहज बोलता बोलता’मध्ये शुक्रवारी राहुल देशपांडे यांच्याशी संवाद

संग्रहित छायाचित्र

आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारे राहुल देशपांडे या लोकप्रिय युवा गायकासमवेत शुक्रवारी (१७ जुलै) शब्दमैफील रंगणार आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘सहज बोलता बोलता’ या उपक्रमामध्ये प्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे गप्पा मारणार आहेत. सायंकाळी पाच वाजता हा दूरचित्र संवाद होणार आहे.

अभिजात गायक, चित्रपट आणि संगीत नाटकांतून भूमिका, ‘वसंतोत्सव’चे संयोजक या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचलेले युवा पिढीतील लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांच्याशी होणाऱ्या संवादातून त्यांच्या सांगीतिक प्रवासाची जडणघडण उलगडेल. उषा चिपलकट्टी, पं. गंगाधरबुवा पिंपळखरे आणि पं. मधुसूदन पटवर्धन यांच्याकडे राहुल देशपांडे यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांचे पुत्र मुकुल शिवपुत्र यांच्याकडून मिळालेल्या तालमीने राहुल यांच्या गायकीला पैलू पाडले गेले.

दूरचित्रवाणीवरील ‘सूर ताल’ आणि ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमाद्वारे अफाट लोकप्रिय झालेल्या राहुल देशपांडे यांच्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, सिंगापूर आणि अमेरिकेमध्ये संगीत मैफिली झाल्या आहेत.

‘माझं घराणं माझ्यापासूनच सुरू होतं’ असे अभिमानाने सांगणारे ज्येष्ठ गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू असलेल्या राहुल देशपांडे यांनी लहान वयापासूनच आपल्या गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकी आणि अभिनयाने रसिकांच्या स्मरणात राहिलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ या संगीत नाटकाचे पुनरुज्जीवन करताना वसंतराव यांनी अजरामर केलेली ‘खाँसाहेब’ यांची भूमिका त्यांनी या नाटकातून साकारली.  डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेल्या काही वर्षांपासून राहुल देशपांडे ‘वसंतोत्सव’चे आयोजन करीत आहेत.

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांच्या कारकीर्दीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती राहुल देशपांडे यांनी केली असून त्यामध्ये त्यांनी वसंतरावांची भूमिका साकारली आहे. संगीत रंगभूमीवर मानाचे पान ठरलेल्या ‘संगीत सौभद्र’ आणि ‘संगीत मानापमान’ या नाटकांचे राहुल देशपांडे यांनी पुनरुज्जीवन केले आहे.

‘सहज बोलता बोलता’ उपक्रमात प्रसिद्ध संवादिनीवादक आणि संगीत अभ्यासक डॉ. चैतन्य कुंटे हे राहुल देशपांडे यांच्याशी संवाद साधणार आहेत. ‘डॉ. अशोक दा. रानडे संगीत अर्काइव्ह’च्या माध्यमातून कुंटे नावीन्यपूर्ण सांगीतिक उपक्रम राबवीत असतात.

वेबसंवादात सहभागी होण्यासाठी इतकेच करा..

* https://tiny.cc/LS_SahajBoltaBolta_17July या लिंकवर जाऊन नोंदणी करा.

* नोंदणी करून झाल्यावर आमच्याकडून तुम्हाला ई मेल आयडीवर संदेश येईल.

* याद्वारे १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता या वेब संवादात सहभागी होता येईल.

– अधिक माहितीसाठी  https://www.loksatta.com/ या संकेतस्थळाला भेट द्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:11 am

Web Title: rahul deshpande on friday in sahaj bolta bolta abn 97
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाउनला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद
2 पुण्यात दिवसभरात २५ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, नव्याने ७५० रुग्ण आढळले
3 पुणे विद्यापीठ चौकातील पूल पाडण्यास सुरुवात; मेट्रो मार्गिकेसह उभारणार नवा पूल
Just Now!
X