पुणे स्थानकाची क्षमता संपली; विस्तार करण्याची मागणी

पुणे : पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाडय़ांची आणि प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत स्थानकातील व्यवस्थांची क्षमता जवळपास संपल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्याला पर्याय म्हणून हडपसर येथे टर्मिनस उभारण्याचे नियोजन आहे. मात्र, निधीअभावी त्याचेही काम रखडले आहे. त्यामुळे भविष्यात स्थानकावरील नियोजन कोलमडून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या टर्मिनसपूर्वी पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करून क्षमता वाढविण्यावर भर देण्यात यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

पुणे रेल्वे स्थानकात वीस वर्षांपूर्वी पन्नास ते साठ गाडय़ांची ये-जा होती. त्या वेळची गरज लक्षात घेता स्थानकातील प्रवाशांसाठीच्या विविध व्यवस्था पुरेशा होत्या. मागील काही वर्षांमध्ये प्रवाशांच्या गरजेनुसार गाडय़ांची संख्या वाढत गेली. मालगाडय़ा वगळता स्थानकात पुणे-लोणावळा लोकलच्या ४४ फेऱ्यांसह सुमारे २५० गाडय़ांची रोजची ये-जा आहे. त्यामुळे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांची संख्याही झपाटय़ाने वाढली आहे. स्वच्छता, पाणी, पादचारी पूल, पार्किंग आदी सर्व व्यवस्थांवर त्यामुळे ताण येतो आहे. भविष्यात प्रवाशांची संख्या वाढतच राहणार असल्याचे चिन्ह आहे.भविष्यात प्रवाशांची संख्या वाढतच राहिल्यास व्यवस्था कोलमडू शकते. मुळात पहिल्यापासूनच प्रशासनाने नियोजन न केल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप होत आहे.

पुणे रेल्वे स्थानकातील सद्य:स्थिती पाहता मध्य रेल्वेकडून पुणे स्थानकाच्या जवळ हडपसर येथे पर्यायी टर्मिनस उभारण्याचे नियोजन केले आहे. सुरुवातीला खडकी स्थानकाच्या विस्ताराचा विचार झाला, मात्र तेथेही पुरेशी जागा नसल्याने हडपसरमध्ये पर्यायी टर्मिनस उभारण्याचे नियोजन करण्यात आले. या ठिकाणी टर्मिनस उभारल्यास पुणे-लोणावळा व भविष्यातील पुणे-दौंड मार्गावरील गाडय़ांसह दक्षिणेकडे जाणाऱ्या गाडय़ा या टर्मिनसवरून सोडण्यात येऊ शकतात. त्यामुळे पुणे स्थानकावरील ताण मोठय़ा प्रमाणावर कमी होऊ शकेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

नव्या टर्मिनसचा विषय रेल्वे अंदाजपत्रकात आला असला, तरी त्याला पुरासा निधी उपलब्ध झालेला नाही. टर्मिनसच्या दृष्टीने काम सुरू झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून पूर्वी सांगितले जात असले, तरी स्थानकांतील सुधारणांची काही कामे करण्यापलीकडे हडपसर स्थानकात कोणतेही नवे काम झाले नाही. त्यामुळे टर्मिनसच्या दृष्टीने तेथे कोणतेही काम होत नसल्याचे दिसते आहे. टर्मिनसपूर्वी पुणे रेल्वे स्थानकातील जागेला योग्य वापर करून स्थानकाची क्षमता वाढविण्याची मागणी सध्या केली जात आहे.

पुणे- लोणावळा रेल्वेसाठी वेगळे नियोजन करून फलाटांची संख्या वाढविण्यावर रेल्वे प्रशासनाने भर द्यावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.

हडपसर रेल्वे टर्मिनसचा प्रकल्पच मुळात चुकीचा आहे. टर्मिनस विकसित करणे मोठी बाब आहे. त्यापूर्वी सध्या पुणे रेल्वे स्थानकात विस्तार करण्यास सध्या पुरेसा वाव आहे. पुणे स्थानकामध्ये आठ आणि नऊ क्रमांकाचा फलाट विकसित होऊ शकतो. तेथूनही लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडता येतील.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा

हडपसर स्थानकावर दोन अतिरिक्त लोहमार्ग आणि एक फलाट वाढवून काही गाडय़ा तेथून सोडण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ५० कोटींच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. मात्र, अद्याप निधी मिळालेला नाही. तो मिळाल्यानंतर काम सुरू होऊ शकेल.

– मिलिंद देऊस्कर, पुणे विभाग रेल्वे व्यवस्थापक