रेल्वेला वर्षांला सुमारे आठशे कोटी रुपये मिळवून देणाऱ्या पुणे विभागातील मनुष्यबळाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसते आहे. गाडय़ांची संख्या व पर्यायाने प्रवाशांची संख्या वाढत असताना त्या तुलनेत पुरेसे मनुष्यबळ नसल्याने एकीकडे फुकटय़ा प्रवाशांची संख्या वाढत असतानाच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योजनांसाठीही मर्यादा येत आहेत. त्यामुळे दैनंदिन पातळीवर होणे अपेक्षित असणाऱ्या कामांसाठी विभागाला विशेष मोहिमांचा आधार घ्यावा लागतो आहे. फुकटय़ा प्रवाशांना पकडण्याबरोबरच परिसरात अस्वच्छता करणारे, बेकायदेशीर लोहमार्ग ओलांडणारे आदींच्या बाबतीत केवळ विशेष मोहिमा राबवून कारवाई करण्यात येत आहे.
पुणे रेल्वे स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्थानक करण्याचे बोलले जात असताना प्रत्यक्षातील स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसते आहे. स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात असताना रेल्वे बोर्डाकडून विविध गोष्टींबाबत होत असलेल्या दुर्लक्षाने सध्या आहे त्या मनुष्यबळावर मोठा ताण असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वेच्या पुणे विभागामध्ये पुणे-लोणावळा, पुणे-दौंड, बारामती आदी महत्त्वाच्या मार्गाचा समावेश आहे. पुणे-लोणावळा उपनगरीय लोकल सेवेचा लाभ दररोज ८० ते ९० हजार प्रवासी घेतात. त्याचप्रमाणे पुणे-दौंड सेवेलाही मोठी मागणी आहे. या मार्गावरील प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे स्थानकाचा विचार केल्यास सध्या या स्थानकावरून लांब पल्ल्याच्या सुमारे पावणेदोनशेच्या आसपास गाडय़ा ये-जा करतात.
 फुकटय़ा प्रवाशांमुळे नुकसान
पुणे स्थानकातील व एकूणच विभागातील प्रवाशांची संख्या वाढत असतानाच विनातिकीट किंवा योग्य तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे रेल्वेची डोकेदुखीही वाढली आहे. पूर्वी लोकल गाडय़ांमध्ये दररोज प्रवाशांच्या तिकिटांची तपासणी करण्यात येत होती. त्याचप्रमाणे प्रत्येक स्थानकाच्या बाहेर पडणाऱ्या किंवा स्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी केली जात होती. मात्र, मागील काही दिवसांपासून हे चित्र गायब झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून रेल्वेत फुकटय़ा प्रवाशांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यासाठीही विशेष माहिमेचा आधार घ्यावा लागतो आहे.
या वर्षी राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांच्या कालावधीत १ लाख २७ हजार ४८३ प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून ७ कोटी ६ लाख ७९ हजार ८५३ रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली. मोहिमेत पकडण्यात आलेल्यांपेक्षा फुकटे अधिक असल्याचा अंदाज आहे. दैनंदिन तपासणी होत नसल्याने रेल्वेला मोठा फटका बसतो आहे. तिकीट तपासनीस पुरेशा प्रमाणात नसल्याने प्रत्येक गाडीत व स्थानकात तपासणी शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
 प्रवासी व रेल्वे सुरक्षेचीही बोंबाबोंब
एकीकडे रेल्वेच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेतली जात असल्याचे बोलले जात असले, तरी पुणे विभागामध्ये रेल्वे सुरक्षा दलातील सुमारे दीडशे ते दोनशे जागा रिक्त आहेत. त्यामुळे  विभागातील रेल्वे सुरक्षिततेच्या उपाययोजनांवर मर्यादा येत आहेत. मुंबईत दहशतवादी हल्ल्यामध्ये रेल्वे स्थानक व गाडय़ांना लक्ष्य करण्यात आल्यामुळे रेल्वेच्या सुरक्षिततेबाबत विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. रेल्वेगाडय़ांमध्ये तसेच स्थानकावर असणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यासाह रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षाही गरजेची आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानकावर मेटल डिटेक्टर व सीसीटीव्ही आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्यक्षात करण्यात येणाऱ्या सुरक्षिततेच्या योजनांना मर्यादा येत असल्याचे दिसते आहे.