अवैधरीत्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम मध्य रेल्वेच्या पुणे विभागात सुरू करण्यात आली आहे. चालू वर्षी या मोहिमेत मार्चपर्यंत ७६४ प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ८१ हजार ७०० रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे.
रेल्वेच्या पादचारी पुलाचा वापर न करता अवैधरीत्या थेट लोहमार्ग ओलांडण्याच्या प्रकारामधून अनेकांचे बळी जात आहेत. या प्रकारामध्ये रेल्वेच्या कामातही व्यत्यय निर्माण होते. थेट लोहमार्ग ओलांडणे हा रेल्वेच्या कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यानुसार रेल्वेकडून अशा प्रवाशांवर कारवाई करण्यात येते. या कारवाईत पकडल्या गेलेल्या व्यक्तीला एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा सहा महिने कैदेची शिक्षाही होऊ शकते.
रेल्वेकडून मागील वर्षी राबविण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत सहा हजारांहून अधिक जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून सात लाखांहून अधिक दंडाची वसुली करण्यात आली आहे. दंड न भरणाऱ्या ३५ जणांना अटक करण्यात आली.
लोहमार्ग ओलांडण्यासाठी स्थानकातील पादचारी पुलाचा वापर करावा. लोहमार्गाच्या कडेने चालणेही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या गोष्टी प्रवाशांनी टाळाव्यात. त्याचप्रमाणे लोहमार्गावरून जाण्याची वेळ आल्यास अशा वेळी मोबाईल हेडफोनचा वापर टाळावा, असे आवाहन मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.