रेल्वेचे आरक्षण १२० दिवस आधी करण्याच्या नव्या निर्णयाने आता विद्यार्थी अडचणीत आले आहेत. रेल्वेचे आरक्षण मिळतच नसल्यामुळे बाहेरील राज्यातील प्रवेश परीक्षांना जाणे आणि परीक्षा संपल्यानंतर आपापल्या घरी जाणे विद्यार्थ्यांना अडचणीचे ठरले आहे. दलालांकडून अधिक किंमत देऊन विद्यार्थ्यांना तिकिटे घ्यावी लागत आहेत.
रेल्वेचे आरक्षण साधारण चार महिने म्हणजे १२० दिवस आधी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी एप्रिलपासून सुरूही झाली. मात्र, या नव्या निर्णयामुळे बाहेरगावी शिकणारे अनेक विद्यार्थी अडचणीत आले आहेत. पुणे, मुंबई, नागपूर या विद्यापीठांबरोबर सिम्बॉयोसिस, डी. वाय. पाटील, भारती विद्यापीठ, आयसर इन्स्टिटय़ूट, अभियांत्रिकी महाविद्यालये या ठिकाणी परराज्यातील विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठे आहे. त्याचबरोबर राज्यातीलही विविध भागांतील विद्यार्थी पुणे, मुंबई विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आता घरी कसे जायचे, असा प्रश्न रेल्वेच्या नव्या नियमामुळे पडला आहे.
शासनाने १२० दिवस आधी आरक्षण करण्याचा निर्णय फेब्रुवारीमध्ये जाहीर केला. मात्र, त्यावेळी विद्यापीठाच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके निश्चित झालेली नव्हती. लेखी परीक्षांची कल्पना विद्यार्थ्यांना असली, तरी प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा यांच्या वेळापत्रकाबाबत अनिश्चितता असल्यामुळे रेल्वेचे आरक्षण करणे विद्यार्थ्यांना शक्य नव्हते. एप्रिल अखेर ते जून हा प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचा कालावधी असतो. मात्र, १२० दिवसांच्या नियमानुसार आता ऑगस्टमधील आरक्षणे विद्यार्थ्यांना मिळू शकतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सुट्टीचे नियोजन कोलमडले आहे. तत्काळमधून तिकिटे मिळण्याची खात्री नाही आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र राखीव कोटाही नाही. परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी बसचाही पर्याय नाही. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना वसतिगृहही लगेच सोडावे लागते. त्यामुळे घरी जाता आले नाही, तर पुण्यात राहायचे कुठे असाही प्रश्न विद्यार्थ्यांपुढे आहे. बाहेरील राज्यात प्रवेश परीक्षा देण्यासाठी जाऊ इच्छिणारे विद्यार्थीही पेचात आहेत. अनेक केंद्रीय संस्था, खासगी संस्था त्यांच्या प्रवेश परीक्षा घेतात. साधारणपणे मे अखेरीस किंवा जून महिन्यात या परीक्षा होतात. मात्र, त्याच्या नेमक्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही रेल्वेचे आरक्षण करणे शक्य झालेले नाही.
याबाबत पश्चिम बंगालमधील सबिता रॉय या विद्यार्थिनीने सांगितले, ‘मी पुण्यात अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेते आहे. चार महिने आधी आरक्षण करण्याच्या निर्णयामुळे मला आता घरी जाण्यासाठी पर्यायच उपलब्ध नाही. पुन्हा पुण्याला येतानाही हीच अडचण येणार आहे.’ नागपूरमधील अर्चना भोसले या विद्यार्थिनीने सांगितले, ‘‘मी अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेते आहे. माझी परीक्षा संपण्यासाठी अजून बराच वेळ आहे. परीक्षा, कॅम्पस इंटरव्ह्य़ू यांचे वेळापत्रक निश्चित नसल्यामुळे मला आधी आरक्षण करता आले नाही आणि आता आरक्षण मिळत नाहीये’’