06 August 2020

News Flash

मागील पावसाळय़ातील दणक्यामुळे यंदा रेल्वेला जाग

पावसाळय़ात दरवर्षी पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असतो.

लोहमार्गालगत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यावर भर

मागील पावसाळय़ामध्ये कामशेतजवळ लोहमार्गाखालील भराव वाहून गेल्याने एक दिवस संपूर्ण वाहतूक ठप्प होण्याचा प्रकार झाल्यानंतर यंदा रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी यंदा लोहमार्गालगत मोठय़ा प्रमाणावर मान्सूनपूर्व कामे करण्यात आली आहेत. काही भागामध्ये लोहमार्गाखालून पाणी वाहून जाण्यासाठी मार्गही तयार करण्यात आले आहेत.

पावसाळय़ात दरवर्षी पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीवर परिणाम होत असतो. कामशेतच्या पट्टय़ामध्ये लोहमार्गावर पाणी येण्याचा प्रकारही दरवर्षी होत असतो. मागील वर्षी लोहमार्गावर पाणी येण्याबरोबरच लोहमार्गाखालील मोठा भरावच वाहून गेल्याने वाहतूक एक दिवस पूर्णपणे ठप्प झाली होती. मुसळधार पावसामध्ये टेकडय़ांवरून मोठय़ा प्रमाणावर वाहत येणाऱ्या पाण्याला जाण्यासाठी योग्य मार्ग नसल्याने हे पाणी भराव बाजूला करून पुढे गेले होते. ही बाब रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने घेतली असून, त्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

मागील तीन ते चार महिन्यांमध्ये पुणे ते लोणावळा टप्प्यामध्ये काही लोकलगाडय़ा रद्द करून कामशेत भागात लोहमार्गाखालून पाणी वाहून जाण्याचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. पावसाळय़ातील पाण्याचा प्रवाह लक्षात घेऊन हे काम करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला, तरी प्रवाहाने येणारे पाणी लोहमार्गाखाली पुढे वाहून जाणे शक्य होणार आहे.

कामशेत परिसराबरोबरच पूर येण्याची शक्यता असलेल्या सर्वच भागामध्ये दक्षता घेऊन आवश्यक ती कामे करण्यात येत आहेत. त्याबरोबरच सांडपाणी वाहून नेणाऱ्या व लोहमार्गाजवळ असलेल्या वाहिन्यांच्या स्वच्छतेचे कामही करण्यात आले आहे. लोहमार्गालगत असणारी झाडे मार्गावर पडून रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकारही अनेकदा झाले आहेत. ही बाब लक्षात घेऊन झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणीचे कामही करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे पावसाळय़ात रेल्वे वाहतूक सुरळीत राहू शकेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 4:56 am

Web Title: railway completing monsoon work in pune
Next Stories
1 शिवणयंत्र वाटपास विलंब; मनसेचे पिंपरी पालिकेत आंदोलन
2 स्कायडायव्हिंगच्या नव्या विक्रमाची पुण्यामध्ये नोंद
3 परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलांना गंडा
Just Now!
X