पावसाळय़ाच्या दिवसांत रेल्वेस्थानकात किंवा रेल्वेच्या डब्यामध्ये एखादा गरमागरम खाद्यपदार्थ घेऊन कुणी आला, तर तो पदार्थ घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही.. पण असे खाद्यपदार्थ किंवा फळे आदी घेताना जरा सावधान..! कारण, रेल्वेस्थानकात व गाडय़ांमध्ये अनधिकृतपणे खाद्यपदार्थाची विक्री करणारी बरीचशी मंडळी फिरत असून, त्यांच्याकडून आरोग्याला हानिकारक अशा पदार्थाची विक्री होऊ शकते. अशा विक्रेत्यांच्या विरोधातच रेल्वेने मोहीम सुरू केली आहे. त्यात असे दीडशे विक्रेते सापडले आहेत. मात्र, त्यापेक्षा अधिक विक्रेते असण्याची शक्यता असल्याने त्याबाबत प्रवाशांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे.
रेल्वेस्थानकामध्ये किंवा रेल्वेगाडय़ांमध्ये प्रवाशांसाठी चहा-कॉफी, पाणी किंवा विविध खाद्यपदार्थ विकण्यासाठी रेल्वेकडून अधिकृत विक्रेते नेमलेले आहेत. या विक्रेत्यांना गणवेश व ओळखपत्र देण्यात आले आहे. रेल्वेस्थानकाच्या परिसरात व रेल्वेगाडय़ांमध्ये या अधिकृत विक्रेत्यांनाच खाद्यपदार्थ विकण्यास परवानगी असते. त्यांच्याकडून विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थाबाबत रेल्वे प्रशासनाकडून वेळोवेळी लक्षही ठेवण्यात येते. मात्र, रेल्वेस्थानकांमध्ये व गाडय़ांमध्ये अनधिकृतपणे खाद्यपदार्थाची विक्री करणाऱ्यांचा भरणाही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे.
अनधिकृतपणे विकले जाणारे खाद्यपदार्थ स्थानकाच्या जवळ असणाऱ्या भागामध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात येत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. खाद्यपदार्थासाठी वापरले जाणारे तेल किंवा इतर साहित्यही निकृष्ट दर्जाचे असते. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्यास धोकाही होऊ शकतो. रेल्वेच्या अधिकृत विक्रेत्यांपेक्षा कमी दराने ही मंडळी खाद्यपदार्थ विकतात. अधिकृत कोणते व अनधिकृत कोणते हे सामान्य प्रवाशाला माहीत नसल्याने त्यांच्याकडूनही असे घातक खाद्यपदार्थ खरेदी केले जातात.
रेल्वेने अशा विक्रेत्यांच्या विरोधात मागील दोन ते तीन महिन्यांपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. वाणिज्य विभाग व रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा या पथकामध्ये समावेश आहे. या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये आजपर्यंत दीडशे अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून प्रशासनाने सुमारे सव्वा लाखाच्या दंडाची वसुलीही केली आहे. ही कारवाई पुणे रेल्वेस्थानकाबरोबरच पुणे विभागात येणाऱ्या सर्वच रेल्वेस्थानकात व रेल्वेगाडय़ांमध्ये करण्यात येत आहे.
अनधिकृत विक्रेत्यांवर रेल्वेच्या वतीने वेळोवेळी कारवाई केली जाते. यंदा सुरू असलेली कारवाई मोठी असली, तरी पकडलेल्या विक्रेत्यांपेक्षा अधिक प्रमाणात अनधिकृत विक्रेते रेल्वेच्या आवारात असल्याचे सांगितले जाते. कारवाई संपल्यानंतर पुन्हा हे विक्रेते रेल्वेस्थानकाच्या आवारात व गाडय़ांमध्ये खाद्यपदार्थाची विक्री करतात. त्यामुळे त्यांना कायमचा आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांनी विक्रेत्यांचा गणवेश व ओळखपत्र पाहूनच खाद्यपदार्थाची खरेदी करणे योग्य ठरेल.