पुण्यात खडकीजवळ बोपोडीत जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर रेल्वेचे इंजिन रस्त्यावर आल्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. अचानक रस्त्यावर रेल्वे इंजिन आल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहायला मिळाले. रेल्वे इंजिन रस्त्यावर आले तेव्हा कोणताही कर्मचारी वाहतुक थांबविण्यासाठी हजर नव्हता. त्यामुळे रत्यावर काहीवेळ वाहतूक कोंडी झाली होती.

खडकी भागात दारुगोळा निर्मितीचा कारखाना आहे. सामनाची ने आण करण्यासाठी कारखान्यात जाण्यासाठी रेल्वे रूळ आहे. गेल्या काही दिवसांपासून हा रूळ बंद होता. ज्यावेळी रेल्वे कारखान्यात जात असे तेव्हा संरक्षण दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी थांबून वाहतूक थांबवित असत.

गुरुवारी अचानक येथे रस्त्यावर रेल्वे आल्यामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुदैवाने यात कोणताही अनुचित घटना घडली नाही.

दरम्यान, खडकी रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या गाडीला मार्ग देण्यासाठी अचानक इंजिन बोपोडीतील महामार्गावर आणलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.