यवतजवळील खामगाव फाटा येथे रेल्वे फाटक ओलांडून पलीकडे जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला सिकंदराबाद-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसची धडक बसली अन् तीन ऊसतोडणी कामगार ठार झाले, तर १९ जण जखमी झाले. रेल्वेगाडी जात असतानाही फाटक सताड उघडे होते. त्यामुळे आता प्रथमदर्शनी त्यात गेटमनचा दोष आढळून आला आहे. पोलिसांकडून या सर्व बाबींची चौकशी सुरू आहे. रेल्वेही स्वतंत्रपणे या घटनेची चौकशी करते आहे. पण, मानवी हस्तक्षेपाबरोबरच या घटनेमध्ये तंत्रज्ञानाचा अभावही कारणीभूत असल्याचे दिसून येते. जवळील स्थानकातून स्वयंचलितरीत्या फाटकाचे कुलूप उघडल्याशिवाय गेटमनला फाटक उघडताच येत नाही. नेमक्या याच तंत्राचा अभाव या ठिकाणी आहे.
एक मालगाडी दौंडच्या दिशेने जात असल्याने खामगाव फाटा येथील रेल्वे फाटक बंद करण्यात आले होते. मालगाडी गेल्यानंतरच लगेचच फाटक उघडण्यात आले. त्यानंतर अवघ्या पाच ते सात मिनिटांनी पुण्याकडे येणारी दुरंतो तेथून गेली व अपघात झाला. या गाडीसाठी हिरवा दिवा होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. त्यामुळे फाटक उघडे राहणे, हीच एक बाब या घटनेत खटकणारी आहे. कोणत्याही स्थानकातून गाडी पुढे गेल्यानंतर त्याची माहिती पुढील स्थानकाला दिली जाते व दोन स्थानकांच्या दरम्यान फाटक असेल, तर गेटमनला त्याचा संदेश दिला जातो. त्यानुसार सिग्नल दिले जातात. दुरंतो यवत स्थानकातून पुढे गेल्यानंतर त्यापुढे असलेल्या उरळी कांचन स्थानकाला त्याबाबत कळविण्यात आले का किंवा तसा संदेश गेटमनला गेला का? या तांत्रिक प्रश्नांची उत्तरे तपासात मिळतील. मात्र, मानवी हस्तक्षेप कमी करणारे व खूप खर्चिकही नसलेल्या तंत्राकडे या अपघातामुळे लक्ष वेधले आहे.
शहरी व मोठी लोकवस्ती असलेल्या भागातील बहुतांश रेल्वे फाटकांसाठी एक स्वयंचलिक यंत्रणा कार्यरत आहे. गेटमनला संदेश मिळाल्यानंतर तो फाटक बंद करतो. मात्र, फाटक पुन्हा उघडणे त्याच्या हातात नसते. कुणी कितीही आग्रह केला, तरी त्याला फाटक उघडता येत नाही. कारण फाटक बंद झाल्यानंतर त्याचा ताबा आपोआपच जवळच्या स्थानकात बसलेल्या व गाडय़ांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवून असलेल्या व्यक्तीकडे जातो. फाटक ‘लॉक’ होते व ते गेटमन उघडू शकत नाही. पुढील पाच-दहा मिनिटांमध्ये या मार्गावरून कोणती गाडी येणार नसल्याची खात्री झाल्यानंतर संबंधित व्यक्ती स्थानकातूनच स्वयंचलित यंत्रणेद्वारे फाटकाचे ‘लॉक’ खोलतो. त्यानंतरच गेटमन ते उघडू शकतो.
खामगाव फाटा येथील घटनेमध्ये गाडी येणार असतानाही फाटक उघडे होते. या मार्गावरून लांब पल्ल्याच्या व महत्त्वाच्या गाडय़ांची वाहतूक सातत्याने सुरू असते. एक छोटीशी मानवी चूक विध्वंस घडवू शकते. हे टाळण्यासाठी तांत्रिक सुधारणा व्हाव्यात, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रेल्वेच्या गेटमनवर नागरिकांचा दबाव
फाटकापासून रेल्वे पुढे गेल्यानंतर तातडीने फाटक उघडले जावे, यासाठी गेटमनवर नागरिकांकडून मोठा दबाव टाकला जातो. मुळात एक गाडी पुढे गेल्यानंतर पुढील चार ते पाच मिनिटे फाटक उघडू नये. त्याचप्रमाणे उघडण्यापूर्वी लोहमार्गावर येऊन दोन्ही मार्ग तपासावेत, अशा सूचना असतात. त्यातून संभाव्य अपघात टाळता येऊ शकतात. मात्र, गाडी गेल्यानंतर लगेचच फाटक उघडावे, असा आग्रह करीत काहीजण गेटमनशी वाद घालतात व त्यातून काहीवेळा घाईगडबडीत फाटक उघडावे लागते. खामगाव फाटा येथील घटनेतही हेच घडले असल्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या हर्षां शहा याबाबत म्हणाल्या की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा हवा तसा वापर रेल्वे करीत नाही. गेटमन म्हणून एक नव्हे, तर दोन व्यक्ती असल्या पाहिजेत. क्रॉसिंगवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक उभारावेत.