गाडय़ांतील मैला विघटनासाठी वापर

रेल्वे गाडय़ांमधील स्वच्छतागृहांतून थेट लोहमार्गावर पडणारा मैला आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणविषयक गंभीर प्रश्नांवर उपाय म्हणून सध्या गाडय़ांमध्ये बायो-टॉयलेट बसविण्यात येत आहेत. या पर्यावरणपूरक स्वच्छतागृहांच्या टाक्यांमध्ये मैला विघटनासाठी शेणाचा वापर करण्यात येत असल्याने पुढील काही महिन्यांसाठी रेल्वेकडून तब्बल ४२ कोटी रुपयांच्या साधारण साडेतीन हजार ट्रक शेण आणि शेणकुटाची  मागणी आहे. भविष्यात बायो-टॉयलेटची संख्या वाढणार असल्याने शेणाची मागणीही वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी आणि गायींचे पालन करणाऱ्यांना उत्पन्नाचा मोठा पर्यायी मार्ग तयार होणार आहे.

मैला जमा होणाऱ्या टाकीमध्ये जिवाणूंची निर्मिती करून मैला विघटन करण्यासाठी शेण किंवा शेणकुटाचा पर्याय चांगला असल्याने रेल्वेकडून तो स्वीकारण्यात आला आहे. सध्या राजधानी, शताब्दी, दुरंतो, तेजस, हमसफर आदी गाडय़ांसह इतर गाडय़ांतील वातानुकूलित डब्यांमध्ये बायो-टॉयलेट बसविण्यात आले आहे. सद्य:स्थितीत सुमारे ऐंशी हजार बायो-टॉयलेटची उभारणी करण्यात आली आहे. त्यात मैला विघटनासाठी शेण किंवा शेणकुटाचा वापर वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सध्या ४२ कोटी रुपयांच्या शेणाची आवश्यकता आहे. पुढील काळात ही गरज आणखी वाढत जाणार आहे.

शेतकऱ्यांना प्राधान्य आवश्यक

लोहमार्गावर पडणारा मैला आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर तोडगा म्हणून बायो-टॉयलेटची संकल्पना चांगली आहे. जिवाणूंच्या निर्मितीतून मैला विघटनासाठी रेल्वेकडून शेण आणि शेणकुटाचा वापर करण्यात येत आहे. पुढील काळात त्याची मोठय़ा प्रमाणावर आवश्यकता निर्माण होईल. मात्र, शेण खरेदीमध्ये शेतकरी, मेंढपाळ आदींना प्राधान्य देणे आवश्यक आहे, अशी मागणी रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी केली. शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा एक पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन भाकड जनावरांपासूनही फायदा होऊ शकेल, असेही शहा यांनी सांगितले.

दरनिश्चिती

बायो-टॉयलेटमध्ये मैला विघटनासाठी शेण किंवा शेणकुटाच्या वापरातून जिवाणूंची निर्मिती करण्याच्या उद्देशाने रेल्वेकडून वेगवेगळ्या ठिकाणी प्रकल्पांचे नियोजन आहे. नागपूर येथे अशाच पद्धतीचा एक प्रकल्प सध्या कार्यान्वित आहे. ३० हजार लिटर जिवाणू तयार करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे. एकूणच बायो-टॉयलेटच्या प्रकल्पासाठी रेल्वेकडून शेण व शेणकुटाची मागणी असून, त्यासाठी सध्या प्रतिकिलो १९ रुपये दर रेल्वेकडून देण्यात येतो.

गरज का?

  • रेल्वे गाडय़ांमध्ये जुन्या पद्धतीच्या स्वच्छतागृहांमुळे दररोज सुमारे चार हजार टन मानवी मैला लोहमार्गावर पडत असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे.
  • त्यामुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणाबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. पर्यावरणवादी संघटनांकडून वेळोवेळी याबाबत आपेक्ष घेण्यात येतो.
  • त्यावर तोडगा म्हणून रेल्वे गाडय़ांमध्ये बायो-टॉयलेटची संकल्पना आणण्यात आली. मात्र, पूर्वी बसविण्यात आलेल्या बायो-टॉयलेटमध्ये तपासणी समितीला मोठय़ा प्रमाणावर दोष आढळून आले.
  • त्यामुळे बायो-टॉयलेटच्या खाली मैला विघटनाची यंत्रणा असणारी टाकी बसविण्यात आली आहे. त्यासाठी शेणाची आवश्यकता आहे.