मावळ परिसरामध्ये झालेल्या धुवाधर पावसामुळे कामशेतजवळ १८ सप्टेंबरला पुणे-मुंबई लोहमार्गाखालील भरावच वाहून गेला होता. या प्रकारामुळे पुणे-मुंबई दरम्यानच्या महत्त्वाच्या गाडय़ा रद्द कराव्या लागल्या होत्या. तातडीने दुरुस्तीचे काम करून दुसऱ्या दिवशी वाहतूक सुरळीत करण्यात आली असली, तरी दुरुस्तीचे हे काम केवळ मलमपट्टीच असून, आणखी एखादा मोठा पाऊस झाल्यास हा धोका पुन्हा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या भागामध्ये ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
पुणे-मुंबई लोहमार्ग मध्य रेल्वेचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. मुंबई-पुणे दरम्यानच्या वाहतुकीबरोबरच मुंबईहून दक्षिणेकडे जाणाऱ्या बहुतांश गाडय़ा या मार्गाने सोडल्या जातात. लोहमार्गाखालील भरावच वाहून गेल्याने या महत्त्वाच्या मार्गावरील गाडय़ा रद्द कराव्या लागल्याने या भागातील पावसाळ्यातील गंभीर स्थिती उजेडात आली. कामशेतजवळ लोहमार्ग नदीच्या जवळून जातो. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी लोहमार्गावर पाणी येण्याचे प्रकार होतात. त्यामुळे रेल्वे वाहतुकीचा खोळंबा होत असतो, मात्र लोहमार्गाखाली मोठय़ा प्रमाणावरील भराव वाहून जाण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला.
कामशेत परिसरामध्ये छोटय़ा-मोठय़ा टेकडय़ा आहेत. मोठा पाऊस झाल्यानंतर टेकडय़ांवरून येणारा पाण्याचा लोंढा नदीच्या दिशेने जात असतो. वाहून येणारे पाणी नदीला मिळताना ते लोहमार्गावर येते. १८ सप्टेंबरला झालेल्या पावसाच्या पाण्याचा लोंढा प्रचंड असल्याने लोहमार्गाखालील भरावाला तोडून पाणी पुढे वाहून गेले. दुरुस्तीच्या कामामध्ये वाहून गेलेला हा भराव पुन्हा टाकण्यात आला आहे. त्यामुळे मोठा पाऊस झाल्यास हा भराव पुन्हा वाहून जाऊ शकतो. त्यामुळे या ठिकाणी लोहमार्गाखालून पाणी वाहून जाण्याची व्यवस्था उभारण्याची गरज आहे. पाण्याचा कितीही मोठा लोंढा आल्यास हे पाणी लोहमार्गाखालून पुढे गेल्यास दरवर्षी निर्माण होणारा धोका टळू शकेल. ठोस उपाययोजनेचे हे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून करण्यात येत आहे.