भारतीय रेल्वेचा भाग असलेल्या ‘रेलटेल’कडून गुगलच्या सहकार्याने विस्तृत नेटवर्कच्या आधारे पुणे रेल्वे स्थानकावर मोफत हायस्पीड पब्लिक वायफाय इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधेचा लाभ पुणे स्थानकावर येणाऱ्या तीन लाख प्रवाशांना होऊ शकणार आहे.
हायस्पीड वायफाय सुविधेबाबत पुणे स्थानकाच्या समावेशामुळे देशभरातील दहा रेल्वे स्थानकांवर हे नेटवर्क कार्यान्वित झाले आहे. यापुढे छोटय़ा स्थानकांचाही या प्रकल्पामध्ये समावेश केला जाणार आहे. जानेवारीमध्ये मुंबईतून सुरू झालेल्या या प्रकल्पामध्ये आता पुण्यासह, रांची, रायपूर, भोपाळ, भुवनेश्वर, विजयवाडा, काचेगुडा (हैदराबाद), एर्नाकुलम (कोची) व विशाखापट्टणम् या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या वर्षांच्या अखेपर्यंत भारतातील सर्वात व्यस्त स्थानकांपैकी १०० रेल्वे स्थानकात ही सुविधा सुरू केली जाणार असल्याचे रेलटेल व गुगलच्या वतीने कळविण्यात आले आहे.
रेलटेलच्या फायबर नेटवर्कवर आधारित असलेल्या या वायफाय सुविधेची रचना ग्राहकांना हायस्पीड ब्रॉडबँड अनुभव देण्यासाठी करण्यात आली आहे. या स्थानकांवरून जाणारे प्रवासी हायडेफिनिशन व्हिडिओ, डेस्टिनेशनचा शोध, पुस्तकाचे डाऊनलोड किंवा नव्या खेळांचा आनंद आपल्या इंटरनेटवर घेऊ शकतील. भारतात इंटरनेटचा वापर वाढत असताना सहज व किफायतशीर हायस्पीड इंटरनेट उपलब्ध होणे, ही गरज आहे. एकूण १०० स्थानकांवर हायस्पीड वायफाय उपलब्ध झाल्यानंतर हा देशातील सर्वात मोठा सार्वजनिक हायस्पीड वायफाय नेटवर्क प्रकल्प ठरेल, असे गुगल इंडियाच्या एक्सेस प्रकल्पाचे प्रमुख गुलझार आझाद यांनी म्हटले आहे.
रेलटेलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. के. बहुगुणा म्हणाले की, रेल्वेमंत्र्यांच्या आराखडय़ानुसार आधुनिकीकरण व रेल्वे प्रवाशांच्या सुविधांमध्ये सुधारणा हे आमचे ध्येय आहे. त्यातूनच भारतीय रेल्वेने प्रवाशांना सर्वोत्तम वायफाय नेटवर्क अनुभव देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.