नियोजनशून्य कारभाराने प्रवाशांत गोंधळ

पावसाळी स्थितीत निर्माण झालेल्या विविध समस्यांमुळे पुणे-मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक १६ ऑगस्टपर्यंत बंद असल्याचे रेल्वेकडून जाहीर करण्यात आले असले, तरी रद्द झालेल्या गाडय़ांचे प्रतीक्षेतील तिकीट ‘कन्फर्म’ झाल्याचे संदेश प्रवाशांना मोबाइलच्या माध्यमातून येत आहेत. रेल्वेच्या तिकीट आरक्षणाची जबाबदारी असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कार्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) नियोजनशून्य कारभाराने प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, संबंधित गाडय़ा रद्दच असल्याचे रेल्वेकडून पुन्हा स्पष्ट करण्यात आले आहे.

पावसाळी स्थितीमुळे मध्य रेल्वेचा पुणे आणि मुंबई विभाग त्याचप्रमाणे मिरजहून कर्नाटकात जाणाऱ्या मार्गावर विविध ठिकाणी लोहमार्गावर पाणी आले आहे. त्याचप्रमाणे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. परिणामी पुणे-मुंबईसह लांब पल्ल्याच्या विविध गाडय़ा गेल्या आठवडय़ापासून रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी आदी गाडय़ा १६ ऑगस्टपर्यंत रद्द राहणार असल्याचे मध्य रेल्वेने शनिवारी जाहीर केले आहे. डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस या गाडय़ाही सध्या तरी १२ ऑगस्टपर्यंत रद्द असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असतानाही काही गाडय़ांचे यापूर्वी प्रतीक्षेत असलेले तिकीट ‘कन्फर्म’ झाल्याचे संदेश प्रवाशांना येत असल्याचे प्रकार घडत आहेत.

पुण्यातील एका प्रवाशाने ५ ऑगस्टला इंटरसिटी एक्स्प्रेसची तीन तिकिटे काढली होती. १४ ऑगस्टच्या प्रवासाची ही तिकिटे प्रतीक्षेत होती. मात्र, शनिवारी या प्रवाशाच्या मोबाइलवर तिकीट ‘कन्फर्म झाल्याचा संदेश आला. गाडीचा डबा आणि आसन क्रमांक प्रवासाच्या चार तास आधी कळविण्यात येणार असल्याचा उल्लेखही संदेशात करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रवाशाचा गोंधळ उडाला. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षां शहा यांनी याबाबत सांगितले की, गाडय़ा रद्द असताना प्रवाशांना अशा प्रकारचे संदेश पाठवून गोंधळाचे वातावरण निर्माण केले जात आहे. आयआरसीटीसी आणि रेल्वेमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे त्यातून स्पष्ट होते आहे. गाडय़ा रद्दची माहिती नसलेले बाहेर गावचे प्रवासी ठरलेल्या दिवशी स्थानकावर दाखल झाल्यास त्यांचे सर्व नियोजन कोलमडणार आहे. याबाबत रेल्वेने तातडीने संबंधित प्रवाशांना योग्य संदेश पाठवून गाडय़ा रद्दची माहिती देणे गरजेचे आहे