राहायला पुणे किंवा आसपासच्या उपनगरात, नोकरीला मात्र मुंबईला.. महागडय़ा मुंबईत राहणे शक्य नाही.. मग पर्याय एकच, रोजचे ‘अप-डाऊन’ अन् वाहतुकीचे साधनही एकच, ते म्हणजे रेल्वे! सरकारी किंवा खासगी कार्यालयातील नोकरीसाठी पुण्यातून रोज मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अनेक दिवसांपासून त्यांच्या माथी ‘लेट मार्क’ चा शिक्का आहे. सकाळी साडेनऊ ते दहा या वेळेत त्यांना नोकरीच्या ठिकाणी पोहोचविणारी रेल्वेची एकही सोयीची गाडी नसल्याने हा ‘लेट मार्क’ कायम आहे.
पुण्याहून सकाळी मुंबईत जायचे व संध्याकाळच्या गाडीने पुन्हा पुण्यात यायचे, ही नोकरीसाठी रोजची कसरत करणारी मंडळी दोन ते अडीच हजारांच्या आसपास आहे. त्यातील बहुतांश मंडळी रेल्वेचे पासधारक आहेत व त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाने कमी वेळेत मुंबईत पोहोचता येत असले, तरी कमी खर्चात मुंबईत पोहोचण्याची व्यवस्था म्हणून मुंबईत जाणारा नोकरदारवर्ग आजही रेल्वेच्या सेवेवर अवलंबून आहे. सकाळी पुण्याहून जाणाऱ्या सिंहगड एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस या गाडय़ांमधून प्रामुख्याने हा नोकरदार वर्ग प्रवास करतो. मात्र, यातील एकही गाडी साडेनऊ ते दहा या वेळेत प्रत्यक्ष नोकरीच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सोईची नाही.
पुण्यातून सकाळी निघणाऱ्या गाडय़ा पुणे विभागातून मुंबई विभागात दाखल झाल्या की, त्यांना लोकल ट्रेनच्या इशाऱ्यावर चालविले जाते. म्हणजेच काही वेळेला एखादी लोकल एक्स्प्रेस गाडीच्या पुढे टाकली जाते, त्यामुळे या गाडय़ा मुंबईत पोहोचण्याला उशीर होत असल्याचे कारण काही प्रवासी देतात. कारण काहीही असले तरी नोकरीला वेळेत मुंबईत पोहोचता येत नाही, हे वास्तव आहे. पुण्याहून येणाऱ्या कामगारांना काही वेळा कार्यालयांकडून पाच-दहा मिनिटांची सवलत दिली जाते. मात्र, सततच उशीर झाल्यास होणाऱ्या परिणामांना या नोकरदारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे सकाळी लवकर एखादी रेल्वे सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे.
पुण्याहून सुटणाऱ्या गाडय़ा पोहोचतात कधी?
पुण्याहून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सिंहगड एक्स्प्रेस सुटते. ही गाडी सकाळी १० वाजता दादरला, तर १० वाजून १० मिनिटांनी छत्रपती शिवाजी टर्मिनसला (सीएसटी) पोहोचते. सकाळी सव्वासात वाजता डेक्कन क्वीन सुटते. ती साडेदहाला दादरला, तर १० वाजून ४० मिनिटांनी सीएसटीला पोहोचते. कर्जत, पनवेल, ठाणे मार्गाने जाणारी प्रगती एक्स्प्रेस सकाळी सात वाजून ५० मिनिटांनी पुण्यातून सुटते व ११ वाजता सीएसटीला पोहोचते.

पुण्यातून मुंबईला सकाळी लवकर पोहोचण्यासाठी सकाळी सहाला सुटणारी सुपरफास्ट गाडी हवी आहे. पुणे- सीएसटी व्हाया कर्जत, कल्याण हे अंतर १९२.४ किलोमीटर आहे. पण, पुणे- वडाळा व्हाया कर्जत, पनवेल हे अंतर १६० किलोमीटर आहे. या मार्गाने दोन तासात रेल्वे जाऊ शकते. वडाळा ते दादर हे अंतर दीड किलोमीटरचे आहे. बसने हे अंतर अगदी कमी वेळेत पूर्ण होते. त्यामुळे या मार्गावरील गाडी सुरू झाल्यास अत्यंत उपयुक्त होईल. त्यातून चाकरमान्यांचे हाल थांबतील व इतर प्रवाशांनाही उत्तम पर्याय उपलब्ध होईल.
– हर्षां शहा
रेल्वे प्रवासी ग्रुप