पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील ठाकरवाडी ते मंकीहील दरम्यान रेल्वेरूळ खचल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतुक थांबवण्यात आली आहे. युद्धपातळीवर याच्या दुरुस्तीचे काम रेल्वेकडून सुरु आहे. या मार्गावरून, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारी कोयना एक्सप्रेस थांबविण्यात आली आहे. या मार्गावर कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही. लोणावळा अाणि खंडाळा परिसरात सध्या सतत पाऊस सुरू अाहे. यामुळे कोयना एक्सप्रेस १ तास खोळंबली तर एक तास सर्व रेल्वे उशिराने धावणार आहेत.

गेल्या काही दिवसांत याच भागात मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचे इंजिन रूळावरून घसरल्याची घटना घडली होती. तसेच याच ठिकाणी डोंगरावरून रेल्वे ट्रॅकवर दगड कोसळल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ खोळबंली होती. परंतु, रेल्वेतीलच प्रवाशांनी तत्परता दाखवत ट्रॅकवरील दगड बाजूला केल्याने येथील रेल्वे वाहतूक सुरळित झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. मंकी हिल येथून रेल्वे ट्रॅक जातो. या परिसरातून मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेंचा वेग कमी असतो. रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. पण याचा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला आहे.