मावळ परिसरामध्ये शुक्रवारी झालेल्या धुवाधार पावसाचा फटका पुणे- मुंबई रेल्वे व रस्ते वाहतुकीला बसला. कामशेत येथे रेल्वे रुळाखालील खडी व भरावच वाहून गेल्याने दुपारनंतर वाहतूक ठप्प झाली. पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व महामार्गावरही मोठय़ा प्रमाणावर पाणी आल्याने दोन्ही रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत झाली. रात्री उशिरापर्यंत रस्ते व रेल्वे वाहतुकीची स्थिती सुधारलेली नव्हती. त्यामुळे पुणे- मुंबई दरम्यानच्या संपर्कावर परिणाम झाला. विविध गाडय़ा खोळंबल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. लोहमार्गाखालील भराव टाकण्यात पावसामुळे अडथळे येत असल्याने हे काम पूर्ण होण्यास विलंब लागण्याची चिन्हे आहेत.
मावळ परिसरामध्ये पहाटे सहापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. सकाळनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे डोंगर व टेकडय़ांवरून प्रचंड वेगाने पाणी वाहू लागले. कामशेत येथे लोहमार्गाचा काही भाग पाण्याखाली गेला. त्यानंतर पाण्याच्या वेगामुळे लोहमार्गावरील भरावच वाहून गेला. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणारी रेल्वे वाहतूक पूर्णपणे थांबविण्यात आली. पुण्याकडे येणाऱ्या सिंहगड, कन्याकुमारी, कोणार्क, सद्याद्री आदी सर्वच गाडय़ा मुंबईतच थांबविण्यात आल्या. काही लांब पल्ल्याच्या गाडय़ा लोणावळा व इतर स्थानकामध्ये अडकून पडल्या.
पुणे- लोणावळा लोकलच्या सेवेवरही परिणाम झाला. रेल्वेकडून तातडीने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असले, तरी पाण्याच्या वेगामुळे भराव टाकण्यात अडथळे येत होते. त्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. गाडय़ा विविध ठिकाणी अडकून पडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीचे काम करण्यात येत होते. पावसाचा जोर कमी होईपर्यंत लोहमार्गाच्या दुरुस्तीचे काम शक्य होणार नसल्याचे रेल्वेच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे रस्ते वाहतुकीचाही मोठा खोळंबा झाला. पावसाचा जोर दिवसभर कायम राहिल्याने डोंगरभागातून वाहणारे पाणी व नदीनाल्यांचे पाणी पुणे- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर आल्याने कामशेत, खामशेत, नायगाव, कान्हेफाटा, सातेगाव, मोहितेवाडी, विनोदेवाडी, वडगाव, कुडेवाडा, तळेगाव आदी भागांमध्ये सुमारे चार ते पाच फु ट पाणी रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. द्रुतगती मार्गावरही मोठय़ा प्रमाणावर पाणी शिरल्याने या रस्त्यावरील वाहतूकही विस्कळीत झाली. दुपारी तीन ते पाचच्या दरम्यान ओझर्डे व कामशेत बोगदा परिसरामध्ये द्रुतगती मार्गावर दोन ते अडीच फुटांपर्यंत पाणी आले होते. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्पच झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीतच होती.