बहुतांश मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेने गाडय़ांची सुविधा दिली असली, तरी पुणे-दौंड या महत्त्वाच्या मार्गावर ही व्यवस्था नसल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. याच कालावधीत राज्य शासनाने पत्र देऊन या मार्गासह इतर ठिकाणीही अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी सेवा सुरू करण्याची सूचना केली होती. या घडामोडींनंतर रेल्वेने हालचाली सुरू केल्या असून, लवकरच पुणे-दौंड मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कामगारांना रेल्वेतून प्रवास करता येणार आहे.

राज्यात सुरुवातीला मुंबईत उपनगरीय सेवा पूर्ववत करण्यात आली. त्या नंतर पुणे-लोणावळा या मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय गाडय़ांच्या काही फेऱ्या सुरू करण्यात आल्या. पुणे विभागातील आणखी एक महत्त्वाच्या असलेल्या पुणे-दौंड मार्गावर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही अद्याप रेल्वेची सुविधा देण्यात आलेली नाही. पुणे ते दौंड या पट्टय़ातून नोकरीच्या निमित्ताने दररोज प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही टाळेबंदीपासून नऊ महिन्यांनंतरही रेल्वेची सुविधा नसल्याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. दौंड-पुणे-दौंड प्रवासी संघाने या प्रश्नावर लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आदींची भेट घेऊन सातत्याने त्याबाबत मागणी केली होती. त्यानंतर शेवटचा मार्ग म्हणून रेल रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. याच कालावधीत राज्य शासनाने मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्र देऊन पुणे-दौंडसह इतर मार्गावरही अत्यावश्यक सेवेतील कामगारांसाठी गाडय़ा देण्याची सूचना केली होती. या सर्व घडामोडींनंतर पुणे-दौंड प्रवासी संघाला रेल्वेकडून पत्र देण्यात आले असून, त्यात पुणे-दौंड मार्गावर लवकरात लवकर सेवा सुरू करण्यात येण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.