तिकीट काढल्यानंतरच भाडे समजत असल्याने कुचंबणा

दुरंतो, शताब्दी आणि राजधानी या रेल्वे गाडय़ांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार बदलती भाडेप्रणाली (फेग्झी फेअर सिस्टिम) लागू केल्यानंतर काही वेळेला विमान प्रवासापेक्षाही जादा भाडे मोजावे लागत असतानाच तिकीट काढल्यानंतरच भाडे समजत असल्याने या तिकिटांचा प्रवाशांनी चांगलाच धसका घेतला आहे. तिकिटाचे बुकिंग झाल्यानंतर खिशात पुरेसे पैसे नसल्यास अनेक प्रवाशांची कुचंबना होत आहे.

रेल्वे प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी दुरंतो, शताब्दी आणि राजधानी या गाडय़ांबरोबरच प्रीमियम, सुविधा गाडय़ा तसेच वेगवेगळ्या गाडय़ांना असलेल्या सुविधा, प्रीमियम डब्यांनाही बदलती भाडेप्रणाली लागू केली आहे. संबंधित गाडय़ांना मिळणारा प्रतिसाद पाहून रेल्वेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. सुरुवातीची दहा टक्के तिकिटेच नियमित दरात दिली जातात. त्यानंतर मागणीप्रमाणे तिकिटाचे दर वाढविले जातात.

पुणे ते दिल्ली दुरंतो एक्स्प्रेसच्या प्रवासाचे उदाहारण घेतल्यास दिवाळी, दसरा आदी सुटीचे दिवस किंवा जोडून येणाऱ्या सुटय़ांमध्ये ‘थ्री टायर एसी’ डब्यातील तिकिटांचा दर काही वेळेला दहा हजारांच्या आसपास असतो. मागणीच्या वेळेला पुणे ते दिल्ली विमानाच्या तिकिटाचा दर सात ते आठ हजारांच्या आसपास असतो. यातून रेल्वेला उत्पन्न मिळत असले, तरी प्रवाशांचा खिसा मात्र रिकामा होतो. सद्यस्थितीत प्रवाशांना सर्वात त्रासदायक बाब म्हणजे संबंधित गाडय़ांच्या तिकिटाचे दर लॉटरीप्रमाणे प्रवाशाला अगदी शेवटच्या क्षणी कळविले जातात. याबाबत तीव्र अक्षेप नोंदविण्यात येत आहे.

कोणत्याही विमानाच्या तिकिटाचे आरक्षण करताना संबंधितांकडून प्रवासाचे भाडे आधी जाहीर केले जाते. मात्र, बदलत्या भाडेप्रणालीतील रेल्वे गाडय़ांच्या तिकिटाचा दर प्रवाशाला सांगितला जात नाही. अगदी आरक्षण खिडकीवर गेल्यानंतरही कर्मचारी तिकिटाचा दर सांगत नाही. संबंधित गाडीतील प्रवासासाठी आवश्यक ती सर्व माहिती भरून घेतल्यानंतर तिकीट आरक्षित केले जाते. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिकिटाचे पैसे भरण्याच्या वेळेलाच दर सांगितला जातो. त्यामुळे तिकिटासाठी किती पैसे लागतील, याचा अंदाजही प्रवाशांना येत नाही. अनेकदा पुरेसे पैसे जवळ नसल्यास प्रवाशाची कुचंबना होते. त्यामुळे तिकीट रद्द करण्याची नामुष्की ओढवते. त्यामुळे मुळात ही पद्धतच रद्द करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

बदलत्या भाडेप्रणालीतील गाडय़ांच्या तिकिटाचा दर तिकीट काढेपर्यंत प्रवाशांना सांगितला जात नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होते आहे. बदलत्या भाडेप्रणालीत अनेकदा विमानापेक्षाही रेल्वेचे भाडे अधिक होते. त्याचा फटका प्रवाशांना बसतो. मुळात ही पद्धत चुकीची आहे. काही प्रमाणात अधिकचा दर लावून तिकिटाचे भाडे निश्चित करावे आणि विमान कंपन्यांप्रमाणे संबंधित गाडय़ांतील तिकिटांचे दरही आधीच प्रवाशांना कळणे आवश्यक आहे.      – हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा