दुपारी भाजणारे ऊन, अधूनमधून दाटून येणारे आभाळ आणि दमट हवा अशा विषम वातावरणात बुधवारी सायंकाळी पुण्याच्या काही भागात पावसाच्या जोराच्या सरी बरसल्या. गेले काही दिवस हवामान ढगाळ राहात असले तरी पाऊस पडत नव्हता. त्यामुळे छत्री-रेनकोट न घेताच बाहेर पडलेल्या पुणेकरांची या पावसाने काही काळ तारांबळ उडवली.  शहर आणि परिसरात काही दिवसांपासून कमाल तापमान कमी झाले होते. बुधवारी ते पुन्हा वाढून ३७.७ अंश झाले, तर लोहगाव येथे ते ३८.९ अंशांवर गेले. सकाळपासूनच हवा ढगाळ असली तरी दुपारी उन्हाचे चटके बसतच होते. त्यात थोडय़ा-थोडय़ा वेळाने मळभही दाटून येत होते. सायंकाळी मात्र मळभ येण्यासह लवकरच अंधारुनही आले आणि काही भागात पाऊस सुरू झाला. हा पाऊस फार काळ टिकला नाही परंतु त्याने वाहनचालक ,पादचाऱ्यांची काही काळ धावपळ उडवून दिली.

येता आठवडा पुणेकरांसाठी पावसाचा

वेधशाळेने पुढच्या सहा दिवसांसाठी वर्तवलेल्या अंदाजानुसार शुक्रवारपासून पुणे व परिसरात पावसाची शक्यता आहे. ३ ते ७ जून या कालावधीत रोजच काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. पुढचे दोन दिवस कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसवर जाईल व शुक्रवारपासून ते कमी होऊन मंगळवापर्यंत ते ३४ अंशावर उतरेल.