वातावरणात झालेले स्थानिक बदल आणि वाढलेल्या तापमानाचा परिणाम म्हणून पुण्यासह कोकण आणि मराठवाडय़ातील काही भागात मंगळवारी वादळी पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाडय़ापासून थोडासा दिलासा मिळाला. येत्या शनिवापर्यंत पुण्यासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. पुण्यात मंगळवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत ४.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर पुण्याचे तापमान ३८.६ अंश नोंदले गेले.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान चाळीस अंशांच्या पुढे गेले होते. त्यामुळे नागरिक उकाडय़ाने हैराण झाले होते. विदर्भ व मराठवाडय़ात तर पारा ४२ ते ४३ अंशांवर पोहोचला होता. पण, वाढलेले तापमान आणि स्थानिक वातावरणातील बदल यामुळे मंगळवारी पुणे जिल्ह्य़ासह राज्यात अनेक ठिकाणी वादळी पाऊस झाला. पुणे जिल्ह्य़ात सकाळपासून कडक ऊन होते. मात्र, दुपारनंतर अचानक आकाश भरून आले. दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. इंदापूर, भिगवण, दौंड, खेड शिवापूर, तळेगाव, कात्रज, पुणे शहर, पिंपरीतील पिंपळे गुरव, औंध, रहाटणी, आकुर्डी परिसरात जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांना उकाडय़ापासून दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही पुण्यात घडल्या.
राज्यात येत्या शनिवापर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भात मेघगर्जनेसह जोरदार वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, पुण्यात देखील पुढील दोन ते तीन दिवस वादळी पावसाचा अंदाज पुणे वेधशाळने वर्तविला आहे.