अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी स्थिती आणि तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता पुढील ४८ तासांत वाढणार आहे. मात्र, हा पट्टा पुढे ओमानच्या दिशेने सरकणार आहे. त्यामुळे राज्यात फार काळ ढगाळ स्थिती राहणार नाही. सध्या दक्षिण भारतामध्ये इशान्य मोसमी वारे सक्रिय आहेत. या भागातून आद्र्रता येत असल्याचा परिणाम म्हणूनही महाराष्ट्रातील ढगाळ वातावरणात भर पडली आहे. त्याचप्रमाणे गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार होऊन तापमानात मोठी वाढ झाली आहे. सरासरीखाली गेलेले रात्रीचे किमान तापमान सध्या सरासरीपेक्षा २ ते ६ अंशांनी वाढले आहे. सध्याची पावसाळी स्थिती आणखी एक ते दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. शुक्रवारी पुणे शहर आणि जिल्ह्यतील काही भागांत जोरदार पाऊस झाला. कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यंत काही भागांत तुरळक सरी कोसळल्या. विदर्भातील गोंदिया आणि नागपूरमध्येही पावसाची हजेरी होती.