राज्यात कोकण विभागासह राज्यात घाटमाथ्यांच्या परिसरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १४ जुलैपर्यंत राज्यात विविध ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कायम राहणार आहेत. काही भागांत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

कमी दाबाच्या पट्टय़ामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रासह काही भागात गेल्या आठवडय़ापासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतो आहे. सध्या पूर्व मध्य अरबी समुद्र आणि किनारपट्टी ते लक्षद्वीपपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. त्यामुळे पावसाची अनुकूल स्थिती अद्यापही कायम आहे. परिणामी पुढील काही दिवस तरी कोकणात पाऊस विश्रांती घेणार नाही. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यंत काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. ११ ते १४ जुलै या कालावधीत कोकण विभागासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस कोसळणार आहे.

शुक्रवारी (१० जुलै) मराठवाडा वगळता इतर विभागांत हलक्या पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर, रत्नागिरी आणि अकोला येथे मोठय़ा पावसाची नोंद झाली.  कोकणातील पोलादपूर, मानगाव, खेड या भागांत १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला.