News Flash

दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता

उत्तरेकडील राज्यांमध्ये मोसमी पावसाने शेवटच्या टप्प्यामध्ये जोरदार हजेरी लावली होती.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राजस्थानच्या काही भागातून नैर्ऋत्य मोसमी पाऊस माघारी फिरल्याने पावसाचा परतीचा प्रवास सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत संपूर्ण उत्तरेतून पाऊस माघारी येईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, ३० सप्टेंबरला दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडेल, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तरेकडील राज्यांमध्ये मोसमी पावसाने शेवटच्या टप्प्यामध्ये जोरदार हजेरी लावली होती. सद्य:स्थितीत बहुतांश ठिकाणी कोरडे हवामान निर्माण होऊन पाऊस माघारी फिरतो आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पश्चिम राजस्थानात कोरडे हवामान आहे. राजस्थानचा काही भाग, कच्छ, उत्तर अरबी समुद्र आदी भागातून २९ सप्टेंबरला मोसमी पाऊस माघारी फिरला आहे. त्याचप्रमाणे राज्यस्थानातील उर्वरित भागासह पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात आणि उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून येत्या दोन ते तीन दिवसांत मोसमी पाऊस माघारी फिरेल. संपूर्ण राजस्थानमधून मोसमी पाऊस माघारी फिरल्यानंतर साधारणत: सात ते दहा दिवसांत महाराष्ट्राच्या बहुतांश भागातूनही मोसमी पाऊस माघारी जातो, असे हवामान शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान राज्यातून पाऊस माघारी जाईल, अशी शक्यता आहे.

मराठवाडय़ात सर्वात कमी पाऊस

हवामान विभागाने दिलेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार १ ते २९ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण देशात सरासरीच्या ९१ टक्के पाऊस झाला असून, ९ टक्के पाऊस कमी आहे. राज्यामध्ये कोकणात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस आजवर पडला आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण काहीसे कमी असून, या भागात सरासरीपेक्षा आठ टक्के कमी म्हणजेच ९२ टक्के पाऊस झाला आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण ९३ टक्के आहे. मराठवाडय़ात मात्र सर्वात कमी पाऊस झाला आहे. या ठिकाणी सरासरीपेक्षा तब्बल २० टक्के कमी म्हणजे केवळ ८० टक्केच पाऊस पडला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 12:50 am

Web Title: rain in maharashtra 5
Next Stories
1 गिरीश महाजनांच्या कालवा फुटीच्या विधानावरुन राष्ट्रवादीचा हल्लाबोल; पुण्यात फ्लेक्सबाजी
2 पिंपरीतील थेरगावमध्ये ट्रान्सफॉर्मरला आग
3 टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘अभिमत’ दर्जा काढणार?
Just Now!
X