नैर्ऋत्य मोसमी वारे गोव्याच्या जवळपास

पुणे : कोकणच्या किनारपट्टीला तडाखा देत जमिनीवर उतरलेले आणि सौम्य झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ सध्या विरले आहे. त्याचे कमी दाबाच्या पट्टय़ात रूपांतर झाले असून, हा पट्टा विदर्भापर्यंत पोहोचला आहे. दुसरीकडे मोसमी पाऊस मात्र प्रगतिपथावर आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे गुरुवारी (४ जून) कर्नाटकच्या कारवापर्यंत धडक मारीत गोव्याच्या जवळपास पोहोचले आहेत. पोषक स्थितीमुळे त्यांची आणखी प्रगती होणार आहे. त्यामुळे राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ ३ जूनला दुपारी अलिबागजवळ धडकले. रायगड जिल्ह्यत मोठे नुकसान केलेले हे चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकल्यानंतर सौम्य झाले. नंतर ३ जूनलाच त्याचे चक्रीवादळातून तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले. त्यामुळे नाशिक आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. सध्या कमी दाबाच्या पट्टय़ाचे स्वरूपही सौम्य होऊन तो विदर्भ आणि मध्य प्रदेशच्या दरम्यान आहे. या भागात त्यामुळे पाऊस होतो आहे.

‘निसर्ग’ चक्रीवादळ विरले असतानाच मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला पुन्हा वेग मिळाला आहे. याच चक्रीवादळाची अरबी समुद्रात निर्मिती होत असताना मोसमी वाऱ्यांचा प्रवास अरबी समुद्रात वेगाने झाला होता. त्यामुळेच १ जूनला अगदी नियोजित वेळेत मोसमी वारे केरळमध्ये दाखल झाले होते. ‘निसर्ग’ कोकण किनारपट्टीकडे मार्गस्थ होत असताना २ जूनला मोसमी वाऱ्यांचा प्रवास थांबला होता. मात्र, वादळ निघून गेल्यावर मोसमी वाऱ्यांची प्रगती पुन्हा सुरू झाली. सध्या त्यांनी कर्नाटक आणि मध्य अरबी समुद्राचा बराचसा भाग व्यापला आहे. बंगालच्या उपसागरात ८ जूनपासून नवे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत आहेत. पश्चिम मध्य भागात होणाऱ्या या परिणामामुळे या परिसरातून मोसमी वाऱ्यांची प्रगती होऊ शकणार आहे.

नाशिकमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद

‘निसर्ग’ चक्रीवादळाचा प्रभाव असताना गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. विदर्भात आणि मराठवाडय़ात काही ठिकाणी पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठपूर्वीच्या चोवीस तासांमध्ये हवामान विभागाने राज्यात नोंदविलेल्या आकडेवारीत नाशिकमध्ये सर्वाधिक १४४.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. इतर ठिकाणी नोंदलेला पाऊस पुढील प्रमाणे (अंश सेल्सिअसमध्ये)- मुंबई ९७.४, रत्नागिरी ५२.६, पुणे ४३.१, नागपूर १८.०, औरंगाबाद २२.९, कोल्हापूर १४.७, सातारा ५७.१, जळगाव २९.५, परभणी २२.२, सांगली ११.७, अकोला १२.५, मालेगाव ६०.०.