मार्च अखेपर्यंत पावसाची शक्यता कायम

पुणे : पुणे, पिंपरी- चिंचवड शहर परिसरासह जिल्ह्यतील विविध भागांत बुधवारी (२५ मार्च) जोरदार पावसाने तडाखा दिला. अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली होती. सध्या संचारबंदी लागू असल्याने या पावसाचा जनजीवनावर परिणाम झाला नसला, तरी करोनाच्या संसर्गात झालेल्या या पावसामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहर आणि परिसरामध्ये मार्चच्या अखेपर्यंत पावसाळी स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत असून, सध्या राज्याच्या काही भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची हजेरी आहे. पुणे शहर आणि परिसरातही पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी शहराच्या काही भागात दुपारी चारनंतर हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर पुढील दोन दिवसही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. बुधवारी पहाटेपासून आकाश ढगाळ झाले होते. शहराच्या विविध भागामध्ये पहाटे वारे सुटले होते. त्यापाठोपाठ पावसाने हजेरी लावली.

शहरात सकाळीही ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दुपारी अनेक ठिकाणी आकाशात काळे ढग दिसून येत होते. त्या वेळी चांगलाच उकाडा जाणवत होता. दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान अनेक भागामध्ये वाऱ्यांसह जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरातील मध्य भाग, कात्रज, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, औंध परिसर, कोंढवा आणि संपूर्ण उपनगरांसह पिंपरी- चिंचवड शहर परिसरात पावसाची हजेरी होती. सध्या शहरात संचारबंदी लागू आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा फारसा फटका बसला नाही. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर या पावसाने चिंतेत भर टाकली आहे. नागरिक आणि वाहने नसल्याने शुकशुकाट असलेल्या शहरातील रस्त्यांवर या पावसामुळे मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. पावसानंतर काही काळ थंडावला निर्माण झाला असला, तरी संध्याकाळी पुन्हा उकाडय़ात वाढ झाली.

पुण्यातील पावसाचा अंदाज

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार २६ आणि २७ मार्चला शहर आणि परिसरामध्ये आकाशाची स्थिती सामान्यत: ढगाळ राहणार असून, या दोन्ही दिवशी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर ३० मार्चपर्यंत आकाशाची स्थिती ढगाळ राहून हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ३१ मार्चलाही शहरात आकाश ढगाळ राहणार आहे. या दरम्यान दिवसा आणि रात्रीच्या तापमानात काही प्रमाणात चढ-उतार होण्याचा अंदाज आहे.