पुणे : नव्या वर्षांच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच अद्यापही पावसाचे सावट आहे. ऐन नाताळच्या तोंडावर, मंगळवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात चढ-उतार होत आहेत. कधी गुलाबी थंडी, कधी कडकडीत ऊन, तर कधी ढगाळ आकाश असे वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे नाताळच्या दरम्यान वातावरणात असणारा गारवा सध्या गायब झाला आहे. नाताळच्या सुमारास किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच वर्तवला होता. त्यानुसार मंगळवारी शहरांतील काही भागात पाऊस पडला.पुढील तीन दिवस वातावरण प्रामुख्याने ढगाळ राहण्याचा अंदाज असून, गोव्यासह राज्यात हलक्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.