आणखी दोन दिवस दुपारनंतर पावसाची शक्यता

पुणे : पुणे शहर आणि परिसरामध्ये सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. उपनगरांमध्ये काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. काही ठिकाणी हलक्या, तर काही भागांत सुमारे तासभर जोरदार सरी कोसळल्या. पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरात आणखी दोन दिवस दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र पावसाळी स्थिती निवळणार आहे. दरम्यान, पावसानंतर शहरात काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता.

चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यात बहुतांश ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट झाली आहे. त्यानुसार पुणे शहर आणि परिसरातही तीन दिवसांपासून संध्याकाळी पाऊस हजेरी लावतो आहे. दोन दिवसांच्या तुलनेत सोमवारी पावसाची तीव्रता अधिक होती. दुपापर्यंत निरभ्र स्थिती असताना पाचच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी झाली. साडेपाचच्या सुमारास प्रामुख्याने उपनगरांमध्ये जोरदार सरी बरसल्या. कोथरूड, हडपसर, मगरपट्टा, मांजरी, मुंढवा या भागात तासभर जोरदार पावसासह गारपीटही झाली. लष्कर परिसर, सिंहगड रस्ता, कल्याणीनगर, नगर रस्ता परिसर या भागातही तुरळक पावसासह गारा कोसळल्या.

पावसामुळे शहराच्या कमाल तापमानामध्ये किंचित घट होऊन सोमवारी ते ३९ अंश सेल्सिअसवर आले. मात्र, रात्री ढगाळ स्थिती राहत असल्याने किमान तापमानामध्ये मोठी वाढ झाली असून, ते २२.५ अंशांपर्यंत पोहोचले. त्यामुळे रात्रीच्या उकाडय़ात कमालीची वाढ झाली आहे. १६ आणि १७ एप्रिलला शहरात विजांच्या कडकडाटात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तोवर कमाल तापमानात किंचित घट राहील. निरभ्र आकाश झाल्यानंतर त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.