पुणे : राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारीही कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. इतर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि विदर्भात चंद्रूपर येथे केवळ हलक्या सरींची नोंद झाली. पुढील चार ते पाच दिवस कोकणात पाऊस होणार असला, तरी त्याचा जोर कमी असणार आहे.

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मोठ्या पावसाची शक्यता नाही. विदर्भ ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून एक -दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी पाऊस होईल. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जून महिन्यात दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक पाऊस

कधी गडगडाटासह मुसळधार तर कधी लख्ख ऊन असे गेल्या महिन्याभरातील पावसाचे चित्र असले तरीही जून महिन्यात झालेला पाऊस हा दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिकच होता. महिन्याभरात मुंबई उपनगरात ९० मिमी इतका सर्वाधिक पाऊस झाला असून मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या २० ते ५९ टक्के  अधिक पाऊस झाला.

गेल्या आठवड्याभरापासून पाऊस नाहीसा झाला असून पुढील आठवड्यात अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. ८ जुलैनंतर पाऊस परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी सकाळी ८.३० पर्यंत मुंबई उपनगरात ९६१.४ मिमी तर शहरात ६९५ मिमी पाऊस झाला.

उत्तरेकडे उष्णतेची लाट

मोसमी पाऊस गेल्या १२ दिवसांपासून जागेवरच आहे. सध्या मोसमी पावसाचा प्रवास राजस्थान, दिल्ली, हरियाणा, पंजाब आदी भागांत रखडला असून, याच भागात सध्या उष्णतेची लाट निर्माण झाली आहे.