राज्याच्या बहुतांश भागात गेले तीन-चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ झाली आहे. आठवडय़ापूर्वी १९ टक्क्य़ांवर असलेला पाणीसाठा आता २९ टक्क्य़ांवर पोहोचला आहे. यामुळे राज्यावर आठ-दहा दिवसांपूर्वी असलेले दुष्काळाचे सावट आता जवळजवळ दूर झाले आहे. विशेषत: विदर्भ आणि सह्य़ाद्रीच्या घाटमाथ्यांना सध्या पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. दरम्यान, पुढील दोन दिवसांतही राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी राहील, असा अंदाज वेधशाळेतर्फे व्यक्त करण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हवेचे कमी दाबाचे क्षेत्र काही दिवसांपूर्वी जमिनीवर सरकले. ते बुधवारी मध्य प्रदेशवर होते. त्याची तीव्रता वाढली. त्याचबरोबर अरबी समुद्रात महाराष्ट्र ते केरळ किनाऱ्यालगत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे विदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत चिखलदरा येथे तब्बल २८० मिलिमीटर पाऊस पडला. याशिवाय महाबळेश्वर (२५०), वर्धा (२००), ताम्हिणी (१९०), लाखणी (१८०), गगनबावडा (१७०), आकोट (१५०), कोयना (१४०), नागपूर (१३०), भंडारा (१३०), जळगाव (११०) असा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. याशिवाय राज्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस पडला.
या आणि गेल्या दोन-तीन दिवसांत पडलेल्या पावसाचा परिणाम म्हणून धरणांच्या साठय़ात तब्बल १० टक्क्य़ांनी वाढ झाली. विशेषत: कोकण, नागपूर व पुणे विभागांतील धरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. मराठवाडा आणि नाशिक विभागात मात्र पाणीसाठय़ात विशेष वाढ झालेली नाही. राज्यात बुधवारी धरणांचा एकूण साठा २९ टक्के होता. विभागानुसार पाणीसाठा पुढीलप्रमाणे- कोकण ५८ टक्के, मराठवाडा १५, नागपूर ४९, अमरावती ३२, नाशिक १९, पुणे २९.
(आठवडय़ापूर्वी असलेली टक्केवारी अशी : कोकण ३७, मराठवाडा १५, नागपूर ३७, अमरावती २८, नाशिक १३, पुणे १४)
कोयना धरण ४० टक्के भरले
या वर्षी पाऊस लांबल्यामुळे पाण्याची पातळी नीचांकी गेलेले कोयना धरण आता तब्बल ४० टक्के भरले आहे. या धरणात बुधवारी ४०.५० टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा होता. एकूण साठय़ाच्या तुलनेत तो ४० टक्के आहे. धरणाच्या क्षेत्रात अजूनही मोठा पाऊस सुरू आहे.