पावसाळ्याच्या हंगामातील पहिलाच जोरदार पाऊस सोमवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झाला. जिल्ह्य़ातही चांगला पाऊस झाला असून राज्यातील बहुतांश भागात पाऊस सुरू आहे. पावसाळ्याच्या हंगामात सोमवारी पहिल्यांदाच रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहिले. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतली, तरी येत्या चोवीस तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुण्यात सायंकाळी साडेपाच पर्यंत २३.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटकच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण व इतरही अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अधून-मधून रिमझिम सरी पडत होत्या. मात्र, मोठा पाऊस पडत नव्हता. शहरात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते आणि अधून-मधून पावसाच्या सरी येत होत्या. मात्र, दुपारी साडेबारानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. शहरात सर्वत्र तब्बल एक ते दीड तास जोरदार पाऊस झाला.
पावसाच्या हंगामात पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत होते, तर काही चौकांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूकही संथ गतीने सुरू होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली. दुपारी दोननंतर पाऊस थांबला. मात्र, ढगाळ वातावरण कायम होते. येत्या चोवीस तासांत शहरात पावसाच्या हलक्या सरींबरोबरच काही वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.
धरणक्षेत्रातही धुवांधार पाऊस
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या परिसरात सोमवारी दिवसभरात जोरदार पाऊस झाला. सायंकाळी पाच पर्यंत या चार धरणांमध्ये मिळून सहा टीएमसी पाणीसाठा झाला होता. गेल्या वर्षी याच वेळी धरणांमध्ये १९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. टेमघर धरणात सायंकाळपर्यंत ३९ मिलिमीटर पाऊस झाला आणि धरणात १९ टक्के पाणीसाठा झाला, तर पानशेत धरणक्षेत्रात दिवसभरात २६ मिलिमीटर पाऊस झाला असून या धरणातही १९ टक्के पाणीसाठा झाला आहे. वरसगाव धरण परिसरात २४ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात १७ टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरण परिसरात २२ मिलिमीटर पाऊस झाला असून धरणात ४८ टक्के पाणीसाठा झाला आहे.