मोसमी वाऱ्यांसाठी रविवारनंतरच अनुकूल वातावरण

पुणे : पाऊस पडण्यायोग्य पोषक स्थिती नसल्याने कोकण विभाग वगळता राज्यातील बहुतांश भागात पावसाने अल्प विश्रांती घेतली आहे. कोकण विभागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरूच राहणार असून, उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच हलक्या पावसाची हजेरी राहणार आहे. विदर्भात दोन दिवसांनंतर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या चोवीस तासांत कोकणात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली.

दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा देशातील थांबलेला प्रवास रविवारनंतर अनुकूल वातावरण निर्माण झाल्यानंतरच पुन्हा सुरू होऊ शकणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात मोसमी वारे सक्रिय झाल्यानंतर सर्वाधिक पाऊस कोकण विभागात झाला आहे. या विभागांत बहुतांश ठिकाणी चोवीस तासांचा पाऊस १०० मिलिमीटरपेक्षाही अधिकचा नोंदविला गेला. विभागातील मुंबई परिसरातही सध्या चांगला पाऊस होतो आहे. कोकण पाठोपाठ मध्य महाराष्ट्रात आणि प्रामुख्याने सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील पश्चिम घाट परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या भागांतील नद्यांच्या पाणी पातळीतही लक्षणीयरीत्या वाढ झाली आहे. मात्र, सध्या या भागांतही पावसाचा जोर ओसरला आहे. कोकण विभागात मात्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे.

कोकण विभागामध्ये समुद्रसपाटीपासून वरच्या भागांत हवेची चक्रीय स्थिती आहे. त्यामुळे या परिसरात पुढील चार चे पाच दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कायम राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल. मात्र, बहुतांश भागात पावसाची विश्रांती असेल. विदर्भामध्ये २१ जूननंतर पावसासाठी अनुकूल स्थितीचे संकेत आहेत. त्यामुळे २१ ते २३ जून या कालावधीत कोकणासह विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

श्रीवर्धनमध्ये २४ तासांत २०० मि.मी. पाऊस

गेल्या चोवीस तासांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. रायगड जिल्’ातील श्रीवर्धन येथे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मालवणमध्ये १४० मि.मी., चिपळूण आणि पाली येथे प्रत्येकी १३० मि.मी. पाऊस पडला. दापोली, पेण, पोलादपूर येथे १०० मि.मी.हून अधिक पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा येथे ९०, तर राधानगरी येथे ७० मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला. घाटक्षेत्रातील शिरगाव (१७० मि.मी.), ताम्हिणी (१६० मि.मी.) कोयना (१२० मि.मी) येथेही मोठय़ा पावसाची नोंद झाली आहे.