23 November 2017

News Flash

शहरात दिवसभर पावसाच्या सरी

शनिवारी दिवसभर आणि रात्रीही थांबून-थांबून पाऊस पडत राहिला.

प्रतिनिधी, पुणे | Updated: July 17, 2017 12:27 AM

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

आठवडाभर अधूनमधून पाऊस पडण्याचा अंदाज

अनेक दिवसांपासून पावसाच्या कधीतरी पडणाऱ्या सरींवरच समाधान मानावे लागलेल्या पुणेकरांची पावसाची प्रतीक्षा शुक्रवारपासून संपली आहे. शहर आणि परिसरात शुक्रवारपासून जोराच्या पावसाच्या सरी पडू लागल्या असून रविवारीही दिवसभर अधूनमधून पडणाऱ्या जोराच्या पावसाचे सत्र सुरू राहिले.

शनिवारी दिवसभर आणि रात्रीही थांबून-थांबून पाऊस पडत राहिला. रविवारी देखील सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली होती. एखादी सर जोराची पडून गेल्यानंतर बराच वेळ हलक्या पावसाच्या सरी पडत होत्या. दिवसभर पावसाळी वातावरण राहिल्यामुळे पुणेकरांनी शक्यतो घरातून बाहेर न पडणेच पसंत केले. सुट्टीचा वार असूनही दुपारनंतर आणि संध्याकाळीही रस्त्यांवर तुलनेने गर्दी कमी होती.

‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’च्या (आयएमडी) नोंदीनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजल्यापासून रविवारी संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत पुण्यात ९.९ मिमी पावसाची नोंद झाली. पुढील सहा दिवसांसाठी ‘आयएमडी’ने वर्तवलेल्या हवामानाच्या अंदाजानुसार पुणे व परिसरात सोमवारी आणि मंगळवारीही पावसाच्या काही सरी पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर दोन दिवस थांबून-थांबून पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून शुक्रवारी आणि शनिवारी मात्र मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

First Published on July 17, 2017 12:27 am

Web Title: rain throughout the day in pune city