नालेसफाईची रखडपट्टी; पावसाळी गटार दुरुस्तीच्या कामांसाठी निविदा

पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर शहरातील नालेसफाईची कामे मुदत संपल्यानंतरही सुरू असतानाच आता पावसाळी गटारे, चेंबर आणि सांडपाणी वाहिन्या दुरुस्तीची कामे महापालिका भर पावसाळ्यात हाती घेणार आहे. मध्यवर्ती भागात ही कामे करण्यासाठीची निविदा महापालिका प्रशासनाकडून जून महिन्यात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळ्यातील कामे पावसाळ्यात होणार यावरही शिक्कामोर्तब झाले आहे.

दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात नालेसफाईचा विषय उपस्थित होतो. पावसाळ्यात करावयाची कामे पावसाळा तोंडावर आला तरी सुरूच राहत असल्यामुळे दरवर्षी या प्रकारची कामे वादात सापडतात. नालेसफाई, ओढे-नाल्यांमधील राडारोडा उचलणे, नदीतील घनकचरा आणि प्लास्टिक कचरा उचलण्याबरोबरच कल्व्हर्ट, पावसाळी गटारांची स्वच्छता या कालावधीत केली जाते. मात्र कोटय़वधी रुपये खर्च करूनही नालेसफाई योग्य पद्धतीने होत नसल्याचे चित्र सातत्याने पुढे आले आहे. यंदाही नालेसफाईची कामे करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आदेश असतानाही कामे वेळेवर पूर्ण करता आलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे निमित्त त्यासाठी देण्यात आले. त्यामुळे पंधरा क्षेत्रीय कार्यालयांकडून नालेसफाईची कामे एप्रिल-मे महिन्यात सुरू होऊ शकली नाहीत. त्यानंतर घाईगडबडीत ही कामे सुरू करण्यात आली. सध्या ७० टक्के कामे पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र मुदतीनंतरही शहरातील नालेसफाईची कामे सुरूच आहेत. त्यातच आता पावसाळी गटारे, चेंबर, सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती या कामांची भर पडणार आहे. त्यामुळे भर पावसातही पावसाळापूर्व कामे सुरू राहणार असल्याचे चित्र शहरात दिसेल.

शहरातील कसबा, सोमवार पेठ, नवी पेठ, पर्वती, खडकमाळ आळी, महात्मा फुले पेठ, कोरेगाव पार्क, घोरपडी, सहकारनगर, पद्मावती, मार्केटयार्ड, लोअर इंदिरानगर, अप्पर-सुप्पर इंदिरानगर या प्रभागात पावसाळापूर्व कामे करण्यासाठीची प्रक्रिया महापालिकेकडून जून महिन्यात सुरू करण्यात आली आहेत. त्याबाबतच्या कामांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्यासाठी जुलै महिना उजाडणार आहे. राडारोडा उचलणे, शहाबादी फरशी बसविणे, मॅनहोलमधील गाळ काढणे, चेंबरची दुरुस्ती करणे, सांडपाणी वाहिन्यांची तपासणी करणे, काही ठिकाणी नव्याने सांडपाणी वाहिन्या टाकणे, नाल्यांलगत सीमाभिंत बांधणे, विद्युत दुरुस्ती करणे, पदपथ विकसित करणे अशा विविध कामांचा यामध्ये समावेश आहे.

या कामांसाठी किमान १ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. निविदेतील अटी-शर्तीप्रमाणे ही कामे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे या कामांच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची शक्यता आहे. मात्र ही कामे पावसाळ्यात होणार असून ती त्रासदायक ठरणार आहेत.

निविदा, कामांवरून वादाची शक्यता

गेल्यावर्षी पावसाळ्यातच पावसाळापूर्व कामे सुरू होती. वेळेत निविदा काढण्यात आल्या नव्हत्या. ऐनवेळी घाईगडबडीत काढलेल्या निविदा प्रक्रियेत कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. यंदाही घाईगडबडीतील या कामांवरून पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.